पुणे : सायबर गुन्ह्याच्या शक्यतेमुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यूजीसी नेट परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षेची मागणी त्यांनी केली आहे.
मंगळवारी (ता.१८) देशातील ३१७ शहरात ११ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी यूजीसी नेट ची परीक्षा दिली होती. आता त्याच परीक्षेत सायबर गुन्हा घडल्याची शक्यता आहे. तसा अहवालच इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरनेच शिक्षण मंत्रालयाला दिला आहे. त्या आधारे ही परीक्षा रद्द करण्यात आली. नुकतेच वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट मध्ये घोटाळा झाल्याचे आरोप होत आहे. नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट परीक्षेचा कार्यभार आहे.
नीट मुळे आधीच वादात सापडलेली नॅशनल टेस्टिंग एजन्सी आता नेटमुळे सुद्धा अडचणीत सापडली आहे. परीक्षांमध्ये वारंवार होणारे घोटाळे हे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून, नेटच्या उमेदवारांनाही त्याचा फटका बसला आहे. परीक्षा रद्द करत असताना विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थैर्याचा विचार करूनही आवश्यक उपाययोजना करायला हव्यात. तसेच पुढील परीक्षेची तारीख तातडीने घोषित करावी अशी मागणी ही विद्यार्थ्यांनी केली आहे. सायबर गुन्ह्याची शक्यता बघता क्षणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नेट रद्द करत पुढील तपास सीबीआय कडे दिल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करियर धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने पुढील वेळापत्रक घोषित करण्यात यावे. तसेच भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून, खोलवर तपास करून आवश्यक उपाययोजना करायला हव्यात.
- कमलाकर शेटे, उमेदवार, युजीसी नेट
पदुत्तर शिक्षणानंतर मोठ्या आशेने विद्यार्थी नेटची तयारी करत असतात. ही परीक्षा जर सायबर सुरक्षित नसेल तर विद्यार्थ्यांनी नक्की कशावर विश्वास ठेवावा, हा मोठा प्रश्न आहे. संपूर्ण यंत्रणेची सखोल चौकशी करत दोशींवर कडक कारवाई व्हायला हवी. जेणेकरून भविष्यात असा प्रकार घडणार नाही.
- श्वेता, विद्यार्थिनी, यूजीसी नेट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.