कोरोना योद्ध्यांवर अपघातानंतर पहा काय वेळ आली आहे...

Hospital
Hospital
Updated on

आंबेठाण (पुणे) : कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील महिला कर्मचाऱ्यांवर अपघातानंतरच्या उपचारासाठी लोकवर्गणी काढण्याची वेळ आली आहे. मात्र, त्या काम करत असलेल्या विभागाकडून अद्याप एक दमडी देखील त्यांना मिळाली नाही. त्यामुळे 'हे ची फळ काय मम तपाला! असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

खेड तालुक्यातील करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य सेविका वंदना सोनवणे आणि औषध निर्माण अधिकारी रेश्मा गोरे यांचा ९ जून रोजी करंजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्रातून घरी परतत असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने अपघात झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. सोनवणे यांना चाकण येथे, तर गोरे यांना मोशी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघात घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना कुठलीही माहिती नव्हती. या भागातील जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांना तालुका आणि जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. परंतु, त्यानंतर देखील शासन स्तरावर काहीही कार्यवाही झाली नाही. यावरून शासनच आपल्या कर्मचाऱ्याबाबत किती बेफिकीर आहे, याचा प्रत्यय येत आहे.

या दोन्ही महिला कर्मचारी अतिशय अल्प पगारात कामे करत असून, त्यांचा बराचसा पगार हा करंजविहिरे सारख्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी ये-जा करण्यात खर्च होत आहे. सध्या त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याने दोघींनाही शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार आहे. जिल्हा आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांचा खासगी दवाखान्यांशी समनव्यय असतो. अशा वेळी या योद्ध्यांच्या उपचारासाठी संबंधित विभागाने तात्काळ पाऊले उचलून त्यांच्या दवाखान्यातील खर्चाची जबाबदारी घ्यायला हवी होती किंवा आर्थिक मदत करायचा हवी होती किंवा एखादया जबाबदार अधिकाऱयाने भेट द्यायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. 

या परीस्थितीमध्ये करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीला धावून आले असून, ते लोकवर्गणी गोळा करत आहेत. या जखमींना शासनाच्या आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. याशिवाय कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने दवाखान्यात जाऊन साधी चौकशी देखील केली नाही.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, तर तालुका आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांनी मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले.

संबंधित घटनेचा अहवाल मागवून घेऊ. तसेच, त्यांचे पेपर मागवून घेऊन शासनाच्या वतीने काय मदत करता येईल, ते पाहू.
 - डॉ. भगवान पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी 

अपघाताच्या २४ तासानंतर मला माहिती मिळाली. लगेच तालुका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना तातडीने मदत करावी, असे सांगितले. तसेच, दोन्ही कुटुंबाशी बोलून तुम्ही उपचार करा आम्ही आर्थिक मदत करू, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देखील कर्मचाऱ्यांना मदत करण्याबाबत विनंती केली आहे.
 - शरद बुट्टे पाटील
जिल्हा परिषद सदस्य 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.