Suhana Sakal Swasthaym : बदलत्या जीवनशैलीत कर्करोगाचे मूळ, जाणून घ्या सूत्र कर्करोग टाळण्याचे

बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती यामुळे भारतात कर्करोगाचा वेगाने प्रसार होत आहे.
dr. jyoti dabholkar
dr. jyoti dabholkar
Updated on

- डॉ. ज्योती दाभोळकर, प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक

बदलती जीवनशैली आणि आहारपद्धती यामुळे भारतात कर्करोगाचा वेगाने प्रसार होत आहे. दैनंदिन जीवनात छोट्या बदलांमुळे केवळ कर्करोगच नव्हे; तर मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा इत्यादी जीवनशैलीशी निगडित आजार रोखता येऊ शकतात. आरोग्यपूर्ण जीवनाचा हाच मंत्र मी ‘स्वास्थम्’च्या श्रोत्यांसमोर मांडणार आहे...

प्रश्न - कर्करोगाचे भारताच्या दृष्टीने काय गांभीर्य आहे?

मुळातच जीवघेण्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जीवनशैलीशी संबंधित चुकीच्या सवयींमुळे भारतात कर्करोग वेगाने पसरत आहे. आहारातील अपायकारक बदल, अपुरी झोप, जंक फूड आणि रात्री उशिरा खाण्यामुळे पोटाशी निगडित कर्करोगाचे प्रमाण देशात तीस टक्क्यांनी वाढले आहे. पूर्वी वयाच्या साठीनंतर लोकांना कर्करोग व्हायचा, आज तिशीतील मुलांनाही कर्करोगाचे निदान होत आहे.

कर्करोगातील आव्हानात्मक स्थिती कोणती आहे?

कर्करोग नक्की कोणत्या अवयवाला झाला, यावरून त्याची जटिलता ठरत नाही; तर त्याचे निदान कोणत्या अवस्थेत (स्टेज) झाले आहे, यावर त्याचा जीवघेणेपणा किंवा तीव्रता निश्चित होते. पहिल्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण दुसऱ्या टप्प्यानंतर तो अधिकच आव्हानात्मक ठरतो. कर्करोगाचे उशिरा होणारे निदान ही भारतातील सर्वांत मोठी समस्या आहे.

उशिरा झालेले निदान उपचारांवर मर्यादा आणतात. तसेच, उपचारानंतर संबंधित व्यक्तीला सर्वसामान्य आयुष्य पुन्हा बहाल कसे करता येईल, त्याचे दैनंदिन जीवन कसे सुखकर होईल, याचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर असते. निकामी झालेल्या अवयवांचे पुनःकार्यान्वयन अत्यंत गरजेचे आहे. तिसरी आव्हानात्मक गोष्ट म्हणजे भारतातील कर्करोगाचे रुग्ण आजाराबाबत तपासणीचे सूत्र (फॉलोअप) पाळत नाहीत. सुरुवातीला आठवड्याने, नंतर महिन्याने आणि बरे झाल्यावर दर वर्षी फॉलोअप गरजेचा असतो. एखादी व्यक्ती पूर्णपणे बरी झाल्यास तिचे आयुष्य वाचते. खरे तर आमच्यासाठी हीच कौतुकाची आणि समाधानाची बाब आहे.

देशातील कर्करोग उपचारांमध्ये काही सुधारणा झाल्या आहेत का?

होय, विशेषतः व्यक्तीपरत्वे औषधोपचार पद्धतीत झालेली वाढ निश्चितच आशादायक आहे. किमो, इम्युनो आणि रेडिओ थेरपीमध्येही चांगले बदल झाले आहेत. निदान आणि

उपचारपद्धतीत सकारात्मक बदल झाले असले, तरी शस्त्रक्रियेच्या पद्धतीत फारसे बदल झालेले नाहीत. त्यामुळे डॉक्टरांचे प्रशिक्षण आणि किरणोत्सर्गी शस्त्रक्रियेतील नव्या तंत्रज्ञानावर अधिक मदार आहे. देशातील शल्यचिकित्सकांची संख्या वाढायला हवी, कारण कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता जास्तीत जास्त डॉक्टरांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.

सूत्र कर्करोग टाळण्याचे

व्यसने - सिगारेट, तंबाखू, गुटखा इत्यादी व्यसनांनी कर्करोग होतो. सर्वसामान्य व्यक्तीने याचे गांभीर्य समजून घेऊन त्यापासून दूर राहावे.

आहार - जीवनशैलीत सर्वांत महत्त्वाच्या तुमच्या रोजच्या सवयी आहेत. सवयी आणि आहार संतुलित हवा. फळभाज्या, कडधान्ये, कोशिंबिरी आदींमधून पोषक तत्त्वे कशी मिळतील, याचा प्रयत्न करावा. न्याहरी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण महत्त्वपूर्ण आहे.

व्यायाम - रोज एक तास घाम येईपर्यंत व्यायाम करायला हवा. त्याने तुमचे आरोग्य सुदृढ तर राहते, त्याचबरोबर रोगप्रतिकारकशक्ती आणि रक्ताभिसरण क्रियाही उत्तम होते.

झोप - रोज सहा ते सात तासांची चांगली, गाढ झोप झालीच पाहिजे.

सूर्यप्रकाश - दैनंदिन जीवनात सूर्यप्रकाशाचे प्रचंड महत्त्व असून, रोज तो मिळायलाच हवा.

ताणतणाव - तुमच्या दिनक्रमातील ताण कमी व्हायला हवा. कारण वाढलेल्या ताणतणावाचे आहारावर आणि कामावर दुष्परिणाम होतात.

अध्यात्म आणि सेवा...

चांगल्या सवयी आणि उत्तम ताणतणाव व्यवस्थापन आनंददायी आयुष्यासाठी गरजेचे असते. आपल्या आयुष्यात अध्यात्माला विशेष महत्त्व आहे. कारण, त्यामुळे बदल जीवनाचा अविभाज्य घटक असल्याची भावना दृढ होते.

अध्यात्मामुळे जीवनशैलीला चांगले वळण लागते. अध्यात्माबरोबरच महत्त्वाचे आहे तुमचे कुटुंब आणि त्याचे तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठबळ! परोपकार हे चांगल्या जीवनशैलीचे लक्षण आहे.

आपल्या आई-वडिलांची, कुटुंबातील वडीलधारे आणि गरजूंची सेवा करायला हवी. त्यामुळे मानसिक समाधान तर लाभतेच; त्याचबरोबर तुमची सकारात्मकता आणि प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. ध्येयपूर्ण जीवन जगायला हवे.

राष्ट्रपतिपदक विजेत्या...

कर्करोगातील निष्णात शल्यचिकित्सक असलेल्या डॉ. दाभोळकर यांचा जन्म १९५४ मध्ये झाला. ‘एमबीबीएस’च्या परीक्षेत प्रथम येत त्यांनी राष्ट्रपतिपदक प्राप्त केले होते. त्या १९७९ पासून कर्करोगाचे निदान आणि उपचार यासाठी कार्य करत आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध ‘एमएसकेसीसी’ ही अधिछात्रवृत्ती मिळवून त्यांनी कर्करोगावरील संशोधन केले आहे. त्याचबरोबर ज्ञानदानाचेही कार्य केले. रुग्णांचे प्राथमिक स्तरावर निदान होण्याबरोबरच तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात.

(शब्दांकन - सम्राट कदम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.