प्रत्येक पालक आपल्या पाल्याला उच्च व कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी धडपडत आहे. पण ज्या मुलांना आई-वडील व अन्य नातेवाईक नाहीत अशा निराधार मुलांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल, याचाही समाजाने विचार करायला हवा ! निराधार, एकल पालक व आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे जीवनकेंद्रित व कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळावे, या भावनेने कै. डॉ. माधव हर्डीकर आणि डॉ. शरयू घोले यांनी आणि त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी २००१ मध्ये पुण्यातील कात्रज परिसरातील गुजर-निंबाळकरवाडी येथे राधाबाई हर्डीकर प्राणिजात मंगल संस्था संचालित निराधार व एकल पालक मुलांसाठी जीवनकेंद्रित व कौशल्याधिष्ठित शिक्षण देणारी ‘सुमती बालवन’ ही शाळा सुरू केली.
सुमती बालवन शाळेत विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधिष्ठित IBT (कृषी, पशुपालन, अभियांत्रिकी, अन्न, आरोग्य, ऊर्जा व इलेक्ट्रॉनिक्स) आदींचे शिक्षण दिले जाते. २००१ मध्ये काही मुले दत्तक घेऊन संस्थेने आपले काम सुरू केले. त्यानंतर निराधार मुलांच्या निवासासाठी व शाळेच्या इमारत उभारणीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती व विविध संस्थांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. आज शाळेत पहिली ते दहावीचे ६५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचबरोबर सुमती बालवन शाळेत आजूबाजूच्या गावांतील मुलांनाही शिक्षण दिले जाते.