पुणे: हिंदी, मराठी टीव्ही व चित्रपटांमध्ये आपली एक नाममुद्रा निर्माण करणाऱ्या सुमीत राघवनचे एका प्रदीर्घ खंडानंतर रंगभूमीवर पुनरागमन होत आहे. सुदीप मोडक या नव्या नाटककाराच्या ‘एक शून्य तीन’ या नाटकात युवा अभिनेत्री स्वानंदी टिकेकरसह एका वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत तो दिसणार आहे. रविवारी (ता. ११) या नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात होत आहे.
स्टार्सच्या संगीत रिॲलिटी शोमध्ये अंतिम फेरीत धडक मारत त्यातले उपविजेतेपद व ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या खुमासदार मालिकेतली धमाल भूमिका नावे असलेला सुमीत सध्या ‘रैना बिती जाए’ या जुन्या चित्रपटगीतांच्या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करतो. गेल्या वर्षी ‘संदुक’ या त्याच्या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी तो पुरस्कारांच्या स्पर्धेत होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्या नाटकांमधील या पुनरागमनाच्या भूमिकेविषयी रसिकांमध्ये उत्सुकता आहे.
‘नटाला नाटकाचीच भूक जास्त असते!’ आपल्या पुनरागमनाबद्दल बोलताना सुमीत म्हणाला, ‘‘खरं सांगायचं तर ‘लेकुरे’नंतर गेल्या पाच वर्षांत मी असंख्य संहिता वाचल्या. एका कसदार नाटकाच्या व दमदार भूमिकेच्या शोधात मी होतो आणि या नव्या लेखकाचं हे नाटक ऐकताक्षणीच मला या नाटकाचं वेगळेपण व ताकद जाणवली. शिवाय, माझ्या रूढ ‘इमेज’पलीकडे जाणारी ही भूमिका आहे.
या आधी ‘सस्पेन्स थ्रीलर’ शैलीचं नाटक मी कधीच केलेलं नाही... शिवाय, नव्या ताज्या दमाच्या व अफाट ऊर्जेच्या युवा टीममध्ये काम करण्यात मजा व आव्हान दोन्ही होते!’’
पुण्याच्या समांतर रंगभूमीवर एक गुणी अभिनेत्री म्हणून लौकिक मिळवलेल्या आणि ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’ मालिकेतून घरोघर प्रिय झालेल्या स्वानंदी टिकेकरचे व्यावसायिक रंगभूमीवरील पदार्पण हेही या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य. आपले पहिलेच नाटक असलेल्या लेखक सुदीप मोडकांचा नीरज शिरवईकर यांच्याबरोबर दिग्दर्शनातही सहभाग आहे. नीरज शिरवईकरांनी दिग्दर्शनाशिवाय नाटकाची नेपथ्यरचनाही केली आहे. रोहित प्रधान (संगीत) व जयदीप आपटे (प्रकाश योजना) या युवा तंत्रज्ञांनी अन्य तांत्रिक बाजू सांभाळल्या आहेत. नरेन चव्हाण, अभिजित साटम व ऋजुता चव्हाण हे निर्माते आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.