Suraj Machale : इनामगावचे उपसरपंच मुलांसाठी ठरले देवदूत;शेततळ्यात बुडताना धाडसाने वाचवले प्राण

येथील शेततळ्यात बुडणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांचे प्राण उपसरपंच सूरज मचाले यांनी दाखवलेल्या धाडस व तत्परतेने वाचले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.
Suraj Machale
Suraj Machale sakal
Updated on

आंधळगाव, इनामगाव (ता. शिरूर) : येथील शेततळ्यात बुडणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांचे प्राण उपसरपंच सूरज मचाले यांनी दाखवलेल्या धाडस व तत्परतेने वाचले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे. इनामगाव येथील खरात व कांगुणे कुटुंबातील शिवराज मनोहर कांगुने, सक्षम नवनाथ खरात, ओंकार किरण खरात, गौरव किरण खरात, पृथ्वीराज रवींद्र खरात ही मुले शनिवारी (ता. १५) दुपारी चार वाजता गावातील एका शेतकऱ्याच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती.

परंतु, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व काही मुलांना पोहता येत नसल्याने मुले पाण्यात बुडू लागली. यावेळी इनामगावचे उपसरपंच सूरज मचाले हे शेततळ्याशेजारीच असलेल्या आपल्या बोअरवेलची मोटर बंद करण्यासाठी आले होते. परिसरात मुलांचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. शेततळ्यात सर्व मुले बुडत असल्याचे पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता शेततळ्यात उडी मारून सर्व मुलांना बाहेर काढले. दैवबलवत्तर म्हणून सूरज मचाले यांच्या धाडसामुळे पाचही मुलांचे प्राण वाचले आहेत. विशेष म्हणजे बुडणाऱ्या मुलांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरात सूरज मचाले यांच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शेततळ्यात बुडणारी चार मुले पोहणाऱ्या एका मुलाला घट्ट पकडून धरून जीव वाचविण्याच्या आकांताने ओरडत असल्याचे मी पाहिले. या वेळी क्षणाचाही विलंब न करता मी कपड्यासोबत शेततळ्यात उडी मारली. पहिल्यांदा तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात मला यश आले. त्यानंतर बुडणाऱ्या दोघांना बाहेर काढले. बुडणाऱ्या पाच मुलांना वाचविता आले, याचे मला समाधान वाटते.

- सूरज मचाले, उपसरपंच, इनामगाव (ता. शिरूर)

शेततळ्यात पोहायला गेलेली माझी दोन मुले गावचे उपसरपंच सूरज मचाले यांच्या सतर्कतेमुळे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. स्वतःच्या जिवावर उदार होऊन मुलांना वाचविण्याचे सूरज यांचे काम कौतुकास्पद आहे. आम्ही सर्व कुटुंबीय मनापासून त्यांचे आभार मानतो.

- किरण खरात, मुलांचे वडील

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या महिन्यात पाबळ (ता. शिरूर) येथे शेततळ्यात पडून दोन सख्या भावंडांचा मृत्यू झाला होता, तसेच मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथेही अंदाजे तीन महिन्यांपूर्वी एका शेतमजुराचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेततळी उभारली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी शेततळ्यांना संरक्षक जाळीचे संरक्षण केलेले दिसत नाही. त्यामुळे अपघात होऊन अनेकांचे मृत्यू झाले आहेत. संरक्षक जाळी नसणाऱ्या शेततळेमालकांवर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.