निगडी - तबल्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी.. मग सातवीतून शाळा सोडून सुरू झाला गुरूचा शोध..भूक स्वस्थ बसू देईना, म्हणून सलूनमधील कामाचा आधार घेतला..प्रसंगी तबला नाही म्हणून घरातील भांडीही वाजवली.. छंद जोपासण्यासाठी ना तो कधी हरला, ना परिस्थितीपुढे झुकला... छंदपिसा झालेला तो तबलावादक म्हणून घडला तो लहानपणी पाहिलेल्या स्वप्नामुळेच. अन् आता त्याचा यशस्वी प्रवास सुरू आहे, तो खडतर परिश्रमाने. दिग्गजांमध्ये त्याची ऊठबस सुरू आहे ती नम्रपणामुळे. तो आहे तबलावादक रमाकांत राऊत-जेजुरीकर.
भजनसम्राट अनुप जलोटा, राष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक बापू पद्मनाभ, पद्मश्री हरिहरन, शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे, पं. राजा काळे, पं. श्रीनिवास जोशी, गझल गायक अशोक खोसला, पामेला सिंग, डॉ. रवींद्र घांगुर्डे, पं. सुधाकर सावंत, पंडित शिवकुमार यांचे शिष्य ख्यातनाम संतूरवादक दिलीप काळे अशा दिग्गजांना तबल्याची साथ रमाकांत यांनी केली आहे. यापैकी अनेकांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. थेरगाव येथे वास्तव्यास असणारे रमाकांत पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांच्या श्रेयनामावलीत आहेत. संगीत व वादन क्षेत्रातील मातब्बरांनी रमाकांतचे कौशल्य पाहून पाठ थोपटलीय. मात्र, शहरात त्यांचा वावर कमीच.
तबला हेच करिअर करायचे ठरवून त्यांनी सातवीत शाळा सोडली. त्यानंतर सलूनमध्ये काम करीत गुरूंचा शोध घेतला. १९९३ मध्ये पंडित सुरेश सामंतांनी पुण्यात आणि पंडित भाई गायतोंडे यांनी मुंबईत रमाकांतवर पैलू पाडले. बनारस घराण्याचे पंडित अरविंदकुमार आझाद व पंडित सुनील देशपांडे या गुरूंच्या हाताखाली ते तयार झाले आणि दिग्गज कलाकारांना तबल्याची साथसंगत केली.
अर्थात, हा प्रवास तसा खडतर. २२ वर्षांची ही तपश्चर्या पिंपरीतील सलूनच्या दुकानातून सुरू झाली. अनेक चढउतार या काळात आले. तबला सोडावा लागेल की काय, असेही प्रसंग आले. त्यांच्यामधील गुण हेरून बासरीवादक बापू पद्मनाभ यांनी पंधरा वर्षे कर्नाटकात विविध मोठ्या व्यासपीठावर संधी दिली. कर्नाटकात लोकप्रिय असलेला हा पिंपरी-चिंचवडमधील कलाकार फारच कमी लोकांना माहीत आहे. रमाकांत राऊत यांचा तबलावादक म्हणून आजपर्यंतचा प्रवास इतर कलाकारांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.