पुणे : तुमच्या घरात लहान मुलं आहे का! आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून त्याला वाचवायचे आहे का! पण नेमके करायचे काय! कोणती काळजी घ्यायची! अशा असंख्य प्रश्नांनी डोकं वर काढलयं का! कोरोनापासून मुलांचा बचाव करायचा कसा या चिंतेत तुम्ही आहात का! अहो, मग चिंता नका करून, येथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेत युवा वर्ग सर्वाधिक बाधित झाले. आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. साधारणत: ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे या लाटेत मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आपणही प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे घरातील प्रत्येकाने लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. अगदीच घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाला घरात प्रवेश करू न देण्याइतपत काळजी घेणे उपयुक्त ठरेल, असा सल्ला तज्ञ देत आहेत.
लहान मुलांना कोरोना होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी:
सुरक्षित अंतर पाळण्याची सवय लावा
घराबाहेर पडताना मास्क लावण्यास सांगा
सातत्याने हात स्वच्छ धुवायला सांगणे (सॅनिटायझेशन)
घरात इतरांना कोरोनासदृश्य लक्षणे दिल्यास लहान मुलांजवळ जाणे टाळावे
कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करावी आणि स्वत:ला क्वारटांईन करावे.
मुलांना प्रथिनेयुक्त पौष्टिक आहार देणे. फळांचाही समावेश आहारात असावा.
लहान मुलांचे नियमित लसीकरण व्हावे
‘‘कोरोनाचा प्रादुर्भावामुळे घराबाहेर पडणे टाळण्यासाठी अनेक पालकांनी मुलांचे नियमित लसीकरण थांबविले आहे. परंतु त्यांचे नियमित लसीकरण गरजेचे आहे. एमएमआर, न्युमोनिया, विविध प्रकारचे ताप होऊ नये म्हणून दिल्या जाणाऱ्या अशा १०० टक्के लसीकरण आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांतील लसीकरणाचा ‘बॅक लॉग’ असल्यास तो बालरोगतज्ञांच्या सल्ल्यानुसार भरून काढावा. लसीकरणाने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार असून अन्य आजारांपासून बचाव होणार आहे.’’, असा सल्ला बालरोगतज्ञ डॉ. एम. आर. भालेराव यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला.
कोरोना होऊन गेल्यावर मुलांची घ्या विशेष काळजी
कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गातून बरे झाल्यानंतर (पोस्ट कोविड) बालकांमध्ये ‘मल्टिसिस्टम इन्फ्लोमेटरी सिंड्रोम म्हणजेच ‘एमआयएससी’ आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यावर किमान एक-दोन महिने तरी त्यांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, असा सल्ला बालरोगतज्ञ देत आहेत.
पोस्ट कोविड ‘एमआयएससी’ आजाराची लक्षणे :
ताप येणे (ताप तीन दिवस राहणे)
थकवा जाणविणे
लघवीचे प्रमाण कमी होणे
उलट्या होणे
पोट दुखणे
डोळे लाल होणे
रक्तदाब वाढणे
सूज येणे
लक्षणे दिल्यास तातडीने घ्या काळजी
‘‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये जास्त संसर्ग होणार असल्याचे बोलले जात आहे. कोरोना झाल्यास जवळपास ९० ते ९५ टक्के मुलांमध्ये तो सौम्य आजार स्वरूपात राहील. तर तीन-पाच टक्के मुलांमध्ये कोरोनात न्युमोनिया होण्याची शक्यता आहे. तर एक ते दोन टक्के मुलांमध्ये या आजाराची अतिगंभीर स्थिती असून शकते. त्यामुळे मुलांमध्ये सुरवातीलाच लक्षणे जाणविल्यास तातडीने काळजी घ्या आणि उपचार सुरू करा.’’
- डॉ. एम. आर. भालेराव, बालरोगतज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.