पुणे - राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये पगारदार खात्यांसाठी असलेले विम्याचे मोफत कवच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) शिक्षकांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करून सुमारे वर्षभराचा कालावधी लोटून गेला आहे. तरीही पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची ही मागणी जिल्हा बँकेकडून अद्याप पूर्ण होऊ शकलेली नसल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्हा बँकेच्या आधी नगर जिल्हा बँकेने ही विमा योजना सुरु केली आहे. त्यामुळे किमान आता नगरच्या धर्तीवर तरी जिल्हा बँकेने ही विमा योजना सुरु करावी, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा केली आहे. याशिवाय राष्ट्रीयकृत बॅंकांच्या धर्तीवर ही विमा योजना कार्यान्वित करावी, अशीही मागणी शिक्षकांनी केली आहे. यामुळे शिक्षकांचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबीयांना या विम्याच्या माध्यमातून किमान ३० लाख रुपयांची रक्कम मिळू शकणार आहे.
योजना लगेच गुंडाळली
जिल्हा बॅंकेने याआधी १९९९ मध्ये पहिल्यांदा ही योजना लागू केली होती. परंतु त्यावेळी ती एका वर्षातच गुंडाळण्यात आली. त्यानंतर २०२० मध्ये पुन्हा ही योजना सुरु केली. परंतु त्यावेळीही दोनच वर्षांत पुन्हा ती गुंडाळण्यात आली. या योजनेच्या लाभासाठी शिक्षकांकडून प्रत्येकी सातशे रुपयांचा विमा हप्ता घेतला जात असे. पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे पगाराचे खाते हे जिल्हा बॅंकेच्या विविध शाखांमध्ये आहेत. जिल्ह्यात सध्या साडेअकरा हजार शिक्षक कार्यरत आहेत.
काय आहेत फायदे?
या विमा योजनेंतर्गत किमान ३० ते कमाल ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळू शकतो. पगारदार खातेदाराचा मृत्यू झाल्यास ३० ते ५० लाख, कायम अपंगत्व आल्यास १५ ते २५ लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास १० ते २० लाख रुपये मिळण्याची सोय उपलब्ध होते.
अशी आहे स्थिती
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली होती.
शिवाय याबाबत ३१ जानेवारी २०२३ पर्यंत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही दुर्गाडे यांनी शिक्षकांना दिले होते.
ज्या कर्मचाऱ्यांचे बॅंकेत पगार खाते असते, अशा पगारदार खातेदारांसाठी विम्याचे मोफत कवच बॅंकेकडून दिले जाते.
सध्या ही योजना केवळ राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये चालू आहे.
पुणे जिल्हा बॅंकेनेही याआधी दोन वेळा हा प्रयोग केला होता. परंतु दोन्ही वेळा तो फसला.
त्यामुळे यापुढे कायमस्वरूपी अशी योजना चालू केली पाहिजे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
जिल्हा बँक ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची व शेतकऱ्यांशी निगडित छोटे मोठे प्रश्न सोडविणारी बँक आहे. आम्ही शिक्षक देखील शेतकऱ्यांची मुलेच आहोत. त्यामुळे या बँकेने आजपर्यंत आम्हाला कायमच आधार दिला आहे. आमची नाळ या बँकेशी निगडित आहे. राष्ट्रीयकृत बँकेत ग्राहकांना सेवा देखील व्यवस्थित दिली जात नाही. त्यामुळे आम्हा सर्व शिक्षकांचा विश्वास याच बँकेवर आहे.
- संदीप कदम, अध्यक्ष, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.