Temghar Dam Water : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! टेमघर धरण भरण्याची शक्यता मावळली

पुणे शहराला वरदान ठरलेले आणि मुठा खोऱ्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी लाभदायक झालेल्या टेमघर धरणात सध्या केवळ ८० टक्केच पाणीसाठा झालेला आहे.
Temghar Dam
Temghar Damsakal
Updated on

पिरंगुट - पावसाने कमी हजेरी लावल्याने टेमघर (ता. मुळशी) येथील धरण शंभर टक्के भरण्याच्या आशा मावळल्या आहेत. पुणे शहराला वरदान ठरलेले आणि मुठा खोऱ्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी लाभदायक झालेल्या या धरणात सध्या केवळ ८० टक्केच पाणीसाठा झालेला आहे. पावसाळा संपला तरी हे धरण न भरल्याने पुणेकर आणि मुळशीतील शेतकऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

गेल्या बारा वर्षांचा विचार केल्यास या धरणात शंभर टक्के पाणीसाठा केवळ सहा वेळाच झालेला आहे. पावसाने ओढ देणे अथवा गळतीसाठी पाणीसाठा पूर्ण क्षमतेने न करणे आदी कारणांमुळे सहा वर्षे या धरणात शंभर टक्के साठा होऊ शकलेला नाही.

या वर्षी वरुणराजाने दिवाळीपर्यंत कृपा केली, तर हे धरण भरेल, अशी आशा येथील बळिराजाला अजूनही आहेत. सध्या मात्र पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे भात पिकाला ताण सहन करावा लागणार असून, उत्पादन घटण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

पाटबंधारे विभागाकडील माहितीनुसार, आजअखेर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी २५६८ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. २.९८ टीएमसी इतका पाणी साठा झाला असून, ८०.४५ टक्के धरण भरले आहे. गेल्या वर्षी (सन २०२२) हे धरण १९ सप्टेंबर रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते. २०२१ यावर्षी हे धरण सप्टेंबर महिन्यात १३ सप्टेंबर रोजी शंभर टक्के भरले होते.

सन २०२० या वर्षी ३० ऑक्टोबर, सन २०१९मध्ये ५ ऑगस्ट रोजी, सन २०१४ यावर्षी ५ सप्टेंबर रोजी, सन २०१३ रोजी ३ ऑगस्ट रोजी धरण शंभर टक्के क्षमतेने भरले होते. सन २०१२ मध्ये या धरणात ९० टक्के साठा झाला होता. गळतीमुळे सन २०१५ ते २०१८ या कालावधीत हे धरण शंभर टक्के भरलेले नाही.

या धरणाला गळतीचे प्रमाण मोठे असल्याने सन २०१७ ते सन २०२० या कालावधीत या धरणाच्या ग्राउटिंगचे काम हाती घेतले होते. त्यानंतर या धरणाची सुमारे ९५ टक्के गळती थांबली. त्यामुळे या धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने साठू लागला आहे.

या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०७.९६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३.८१२ टीएमसी इतकी आहे. उपयुक्त साठ्याची क्षमता १०५.०१ दलघमी (३.७१ टीएमसी) आहे. सन २०१० मध्ये दहा मीटरने या धरणाची उंची वाढविण्यात आल्याने पाण्याची साठवण क्षमताही दीड टीएमसीने वाढली आहे.

अद्यापही या धरणाची उर्वरित ५ टक्के गळती थांबण्यासाठी ग्राउटिंगचे व शॅाटक्रीट आदी कामे हाती घ्यावी लागणार आहेत. या धरणाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव जानेवारी २०२१ मध्ये मंजुरीसाठी पाठविला आहे. शासनाची मान्यता मिळताच त्याचे काम पूर्ण करता येईल. मात्र, मान्यता मिळणे आणि काम पूर्ण होणे गरजेचे आहे.

- दीपाली घटकार, उपअभियंता, टेमघर प्रकल्प उपविभाग क्रमांक दोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.