पुणे: गृह विभागाने पुणे शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत सात नवीन पोलिस ठाण्यांना मान्यता दिली असून, त्यासाठी ८१६ नवीन पदांची निर्मिती केली आहे. या सात नवीन पोलिस ठाण्यांचे उद॒घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात शुक्रवारी (ता. ११) दुपारी दोन वाजता होणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयात ३२ पोलिस ठाणी आहेत. काळेपडळ, आंबेगाव, बाणेर, वाघोली, नांदेड सिटी, फुरसुंगी आणि खराडी ही सात पोलिस ठाणी नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील पोलिस ठाण्यांची संख्या ३९ इतकी होणार आहे. हडपसर, वानवडी, कोंढवा या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून काळेपडळ पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले आहे.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे विभाजन करून आंबेगाव पोलिस ठाणे, चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे विभाजन करून बाणेर पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले आहे.
लोणीकंद पोलिस ठाण्याचे विभाजन करून वाघोली पोलिस ठाणे, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे विभाजन करून नांदेड सिटी पोलिस ठाणे, लोणीकाळभोर आणि हडपसर पोलिस ठाण्याचे विभाजन करून फुरसुंगी, तर चंदननगर आणि लोणीकंद पोलिस ठाण्याचे विभाजन करून खराडी पोलिस ठाणे अशा सात पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
या प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस कर्मचारी अशा पदांना मान्यता देण्यात आली आहे.
नवीन ७२० कोटींच्या विविध प्रकल्पांचा प्रारंभ
पुणे शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत नवीन पोलिस ठाण्यांसह एकूण ७२० कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांचे उद॒घाटन होणार आहे.नवीन २८८६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी ४३३ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पोलिस आयुक्त कार्यालयात नवीन इमारतीसाठी १९३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच, बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी २९ कोटींच्या निधीस मान्यता मिळाल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.