-जीवनमूल्ये
डॉ. यशोधन महाराज साखरे
कार्य सिद्ध होण्यासाठी मनाची एकाग्रता अतिशय महत्त्वाची आहे. यास्तव ‘एकाग्रता यशोबीजम्’ असे सांगितले आहे. मन एकाग्र नसेल तर, सोप्यातील सोपी अथवा अवघडातील अवघड गोष्ट साध्य करणे अवघड आहे. ज्या बुद्धीला अथवा मनाला एक अग्र अर्थात एक टोक आहे, त्याला एकाग्र असे म्हणतात. म्हणजेच, एका वेळी एकच विचार करणे, याला मनाची एकाग्रता असे म्हणतात.
मनाला एकाग्र करणे, वाटते तेवढे सोपे नाही. कारण, चंचलता हा मनाचा सहज स्वभाव आहे. चंचल मनाला शांत बसवणे, त्याला एकाग्र करणे, अत्यंत अवघड आहे. या विषयी भगवान श्रीकृष्णाला अर्जुन सांगतात, चंचल हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्। तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्॥’ मन हे चंचल आहे, हट्टी आहे अशा मनाचे नियंत्रण करणे अतीव अवघड आहे. मन चंचल आहे, तो त्याचा स्वभाव आहे आणि मनाची चंचलता दूर केल्याशिवाय, त्याला स्थिर केल्याशिवाय कार्य सिद्धी होणार नाही. मग, या चंचल मनाला स्थिर करण्याचा मार्ग कोणता? त्याचे साधन काय? तर ‘योग.’
महर्षी पंतजली मुनींनी ‘योगशास्त्र’ सूत्रांची रचना केली आहे. यामध्ये बाह्य शरीरापासून मनाला कसे आरोग्य संपन्न ठेवता येईल, याचा विचार केला आहे. हे साध्य करण्यासाठी असलेल्या आसनादि आठ अंगांचा अर्थात अष्टांग योगाचा विचार सांगितला आहे. याद्वारे मनाची एकाग्रता साध्य करता येते. या विषयी भगवान पतंजली म्हणतात, ‘योगस्तु चित्तवृत्ती निरोधः।’
कार्यसिद्धीप्रमाणेच ज्ञानप्राप्तीसाठीसुद्धा मनाची एकाग्रता आवश्यक आहे. भौतिक पदार्थांचे ज्ञान असो अथवा अतींद्रिय अशा आत्मतत्त्वाचे ज्ञान असो, दोन्ही ज्ञानासाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे. ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक एकाग्रता संपन्न मनाला भगवान श्रीकृष्ण ‘व्यवस्थित मन’ म्हणतात. ही व्यवस्थितता प्राप्त होणारे साधन म्हणजे योग. म्हणजेच ज्ञानासाठी आवश्यक मशागत करणारे साधन म्हणजे योग. मानवी जीवन सफलतेकडे नेणारे ते एक महत्त्वाचे जीवनमूल्ये आहे. योगाभ्यासात सांगितलेली आठही अंगांची साधना न्यूनाधिक प्रमाणात वारीमध्ये साधली जाते. कारण, वारीद्वारे मानव ज्ञान संपादन करण्याचा मन एकाग्रतारूप अधिकार प्राप्त करून घेतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.