‘मध्यान्ह भोजन योजने’ची शाळा चांगलीच शिजतेय

‘मध्यान्ह भोजन योजने’ची शाळा चांगलीच शिजतेय

Published on

सोमेश्वरनगर, ता. २६ ः शालेय शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्टीत मे-जूनमध्ये सदतीस दिवसांची ‘मध्यान्ह भोजन योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला, खरा पण मालाचा पुरवठा चक्क निम्मे दिवस उलटल्यावर सुरू केला आहे. शाळांना मात्र मेच्या सुरुवातीपासूनच ‘आहार शिजवूनच द्यायचा’ असा फतवा काढला आहे. आहारासाठी मुले तर शाळेत येत नाहीत, मात्र आदेशावर आदेश येत असल्याने शिक्षकांची कोंडी झाली आहे.

राज्यात चाळीस दुष्काळी तालुक्यांमध्ये शालेय पोषण आहार (मध्यान्ह भोजन) द्यायचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर या तालुक्यांचा समावेश आहे. योजनेत आहार कोरडा वाटण्याऐवजी तो शिजवूनच द्यावा, असा अजब फतवा काढला. योजना २ मे ते १५ जूनला शाळा भरेपर्यंत राबवायची आहे. मात्र, शाळांनाच ३ मेला कळविले. अशात ७ व १३ मे च्या निवडणुकीसाठी शिक्षक व्यस्त होते. याउपर शाळांना तांदूळ व मालही वेळेत मिळाला नाही. काहींनी शिल्लक तांदूळावर दिवस काढले पण मोठ्या पटाच्या विद्यालयांनी कुठून तांदूळ आणायचा? १० मे रोजी ‘एनएसीओएफ’ या कंपनीव्दारे मालाचा पुरवठा होणार असल्याचे पत्र निघाले, पण माल पोचायला २४ मे उजाडला. आता योजनेचे फक्त बारा-तेरा दिवस उरले आहेत. त्यामुळे योजनेतून नेमके कुणाचे पोषण होतेय अशीच चर्चा आहे.

यानंतरही बोध न घेता शिक्षण विभागाने २० मे रोजी पुन्हा पत्र काढून एकही मुलगा वंचित राहू न देता आहार शिजवूनच द्या असा पुर्नआदेश काढला आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नाइलाजाने शाळेवर जाऊन, स्वच्छता करून जवळच्या चार-आठ पोरांना कसेबसे जमवून योजना राबवत आहेत. ऑनलाइन माहित्या भरत आहेत. पण विद्यालयाची मुले एक ते दहा किलोमीटरवरून येतात. त्यांना भातापुरते कसे आणावे? या चिंतेत मुख्याध्यापक आहेत.

बारामतीचे शालेय पोषण आहार अधीक्षक अतुल मोरे म्हणाले, ‘‘मे, जूनच्या सुट्टीत आहार शिजवून देणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना निरोप
द्यायला लावले आहेत. एप्रिलमध्ये शाळांवर आहाराचा माल शिल्लक होता. तो सुरवातीला वापरला. आता योजनेतील मालाचाही शाळांना पुरवठा केला आहे. यातून शिल्लक राहिल्यास जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर वापरला जाईल.’’

योजना चांगली पण...
माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार सागर म्हणाले, ‘‘योजनेचे स्वागतच आहे, शिजवायचा आग्रह कशाला? कोरडा शिधा वाटण्याची परवानगी द्यावी. कारण मुले सुट्टीला गावी जातात, छंदवर्ग लावतात. विद्यालयात मुले खूप दूरवरून येतात. आम्ही प्रयत्न केले, पण आहारापुरते पालक उन्हातान्हात मुलांना पाठवत नाहीत.’’ पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले,‘‘ याबाबत आता शिक्षण आयुक्तांनाच भेटून समस्या सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.