कोरेगाव पार्क : नायडू येथील मुस्लिम दफनभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे दफनभूमीसाठी अतिरिक्त पाच गुंठे जागा देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केल्याची माहिती शाहीन फ्रेंडन्स क्लब महेबुब नदाफ यांनी दिली.
नायडू येथील दफनभूमीला वीस वर्षांपूर्वी दीड ऐकर जागा दिली होती. तर ख्रिश्चन दफनभूमीसाठी दोन ऐकर जागा महापालिकेने दिली होती. मात्र नायडू दफनभूमीत मंगळवार पेठ, पाटील इस्टेट आणि ताडीवाला रस्ता परिसरातील
मुस्लिम समाजातील मृतदेहांचे दफन केले जाते. त्यामुळे येथील दफनभूमित आता जागाच शिल्लक नाही. त्यामुळे मृतदेहाचे दफन करण्याची समस्या निर्माण झाली आहे.
या संदर्भात नदाफ म्हणाले, ‘‘ महापालिकेने मुस्लिम समाजासाठी दीड ऐकर जागा दिली होती. मात्र लोकसंख्येचा विचार करता ही जागा अपुरी होती. ख्रिश्चन समाजाला दिलेल्या दोन ऐकर जागेपैकी खूप जागा शिल्लक आहे. त्यांच्या दफनभूमीशेजारील पाच गुंठे जागा मुस्लिम दफनभूमीला द्यावी. तर ख्रिश्चन दफनभूमीशेजारील अतिरिक्त पाच गुंठे जागा त्या बदल्यात त्यांना द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली आहे.’
‘‘ गेल्या वर्षांपासून अनेकांचे मृत्यू झाल्यामुळे सध्या मुस्लिम दफनभूमीत जागा नाही. या संदर्भात महापालिकेच्या भवन विभागाशी पत्रव्यवहार केले आहे. यामध्ये ख्रिश्चन दफनभूमीतील जागा देण्याची विनंती केली आहे.’’
- दयानंद साेनकांबळे, सहायक महापालिका आयुक्त, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय