महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड

Rajpath_Parade
Rajpath_Parade
Updated on

पुणे : "इंजिनिअरिंग डिल्पोमा करताना दांडपट्टा चालवायला शिकले, त्यानंतर ही कला मी जोपासली, सोबत लावणीही करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. या कला आपल्या मराठी मातीची ही ओळख आहे, त्यामुळेच मला यंदा राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून 26 जानेवारीला राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनात सहभाही होण्याचा सन्मान मिळाला आहे,'' अशा शब्दांत राजश्री माने तिच्या भावना भरभरून व्यक्त करत होती. 

बारामती येथील कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी राजश्री माने, नगर जिल्ह्यातील लोणी येथील गृहविज्ञान आणि संगणिक महिला महाविद्यालयाची सायली चाहणकर आणि नाशिक येथील के.एस.के.डब्लू महाविद्यालयाची जोत्स्ना कदम या तिघींचा राजपथावरील संचलनासाठी निवड झाली आहे. इतिहासात प्रथमच फक्त मुलीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

राजश्री, सायली आणि जोत्स्ना या तिघीही त्यांच्या महाविद्यालयामध्ये 'राष्ट्रीय सेवा योजना'च्या (एनएसएस) माध्यमातून विविध उपक्रमात सहभागी होत. राजपथावर भारताचे सैन्य वगळता इतर कोणालाही संचलनात सहभागी होता येत नाही. ती संधी केवळ 'एनएसएस' मधूनच मिळवता येत असल्याने तिघांनीही त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. नोव्हेंबर महिन्यात हैद्राबाद येथील पश्‍चिम क्षेत्र राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसह, शारीरिक क्षमता सिद्ध केली. त्यातून पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, "यापूर्वी विद्यापीठाचे विद्यार्थी पथसंचलनात सहभागी झाले आहेत, पण यंदा प्रथमच तिन्ही मुलींचाच समावेश असल्याने ही अभिमानाची बाब आहे. इतर मुलींसाठी ही प्रेरणादायी घटना आहे.''

अशी होते निवड
केंद्र सरकारच्या युवा व खेल मंत्रालयातर्फे 'एनएसएस'च्या विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निवड केली जाते. त्यामध्ये 30 गुण सांस्कृतिक सादरीकरण, 50 गुण संचलन आणि प्रत्येकी 10 गुण हे मुलाखत आणि शारीरिक चाचणीसाठी असतात. यामध्ये राजश्री, सायली आणि जोत्स्ना तिघीही पात्र ठरल्या. या तिघींनी वैयक्तिक कला सादरीकरण केलेच. पण शिवाय सामूहिकपणे जोगवा आणि लावणी सादर केल्याने त्यांची निवड झाली.

"राजपथावर संचलन करताना त्यात परेड कमांडर म्हणून माझी निवड व्हावी यासाठी दिल्लीत पूर्ण क्षमतेने सरावात भाग घेणार आहे. तसेच राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात दांडपट्टा चालविण्याची इच्छा आहे.''
- राजश्री माने, विद्यार्थिनी

"राजपथावर संचलनात सहभागी व्हावे हे लहानपणापासून वाटत होते, महाविद्यालयात आल्यानंतर 'एनएसएस'मध्ये सहभागी आणि माझा आत्मविश्‍वास निर्माण झाला. त्यामुळेच आता ही संधी निर्माण झाली आहे.''
- सायली चाहणकर, विद्यार्थिनी

"मी घेत असलेले शिक्षण आणि आपली संस्कृती याबद्दल निवड समितीने प्रश्‍न विचारले. योगासने करून दाखविली, महाराष्ट्राची लावणी आणि जोगवा आम्ही उत्तमप्रकारे सादर केले. त्यामुळे ही दुर्मिळ संधी मिळाली. या संधीचे आता सोने करायचे.''
- जोत्स्ना कदम, विद्यार्थिनी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()