मंचर (पुणे) : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता. २८) मंचर बसस्थानकाच्या पूर्वेला वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या झाडाचा काही भाग रस्त्यावर कोसळला. झाडाखाली सावलीला थांबलेल्या प्रवाशांनी पळ काढला. पण, नारळ विक्रेता व एक मोटरसायकलवरील दांपत्य असे तिघेजण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. (three persons were injured while tree branch fell on pune-nashik highway)
मंचर बसस्थानकाच्या पूर्वेला बाभळीचे झाड आहे. झाडाच्या फांद्या रस्त्याच्या बाजूने वाकलेल्या होत्या. नाशिक, नारायणगाव भागातून पुण्याला जाणाऱ्या अनेक एसटी गाड्या बसस्थानकात येत नाहीत. एसटी गाड्या या झाडाजवळच थांबतात. त्यामुळे प्रवासी या झाडाखाली थांबून एसटीत प्रवेश करतात. पण, सध्या एसटी गाड्या बंद असल्याने प्रवाशांची वर्दळ कमी होती. सध्या येथे खासगी बस, जीप व कारमधून पुणे-मुंबईकडे जाणारे प्रवासी थांबतात. झाडाखाली हातगाडीवर रामदीन कुमार नारळ विक्री करत होते. त्यावेळी त्यांच्या हातगाडीवर झाड कोसळले. उभे असलेले काही ग्राहक व प्रवाशांनी तेथून पळ काढला. पण, मोटरसायकलवरील दांपत्याच्या अंगावर फांद्या पडल्याने ते फांद्याखाली काही काळ अडकले होते.
जवळच असलेल्या श्रद्धा मेडिकल स्टोअर्सचे मालक ऋषिकेश ऊर्फ पप्पू गावडे व अन्य नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी झाडाखाली अडकलेल्या रामदीन व दांपत्याला बाहेर काढले. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या फांद्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. सदर झाडाचा व शेजारी असलेल्या इतर झाडांचा काही भाग अजूनही धोकादायक झालेला आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अधिकाऱ्यांनी या झाडाचा काही भाग काढून टाकावा, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दुर्घटना होऊनही शनिवारी (ता. २९) दुपारपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी घटनास्थळाकडे फिरकले नव्हते. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
“अवसरी फाटा, शेवाळवाडी, मंचर, एकलहरे, कळंब व नारायणगाव सरहद या मार्गावर ३० ते ४० झाडे धोकादायक झाली आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो लहानमोठी वाहने ये-जा करतात. झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सदर झाडे पूर्ण काढून टाकण्याएवजी त्यांच्या फांद्या काढून टाकाव्यात. तसेच, कालबाह्य झालेल्या झाडांच्या ठिकाणी नव्याने वृक्षारोपण करावे.”
- वसंतराव भालेराव, माजी सभापती, आंबेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.