मजुराला जमीन विकूनही पैशाअभावी उपचार थांबविण्याची वेळ

शैलेश ठोंबरे
शैलेश ठोंबरे
Updated on

जमीन विकूनही पैशाअभावी उपचार थांबविण्याची वेळ 
पुणे - अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाच्या उपचारासाठी मजुरी करणाऱ्या पित्याने दागदागिने, शेतजमीन विकली, अनेक ठिकाणांवरून बारा लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले, उसनवारीही केली. मात्र, उपचारांत कधीही खंड पडू दिला नाही. गेल्या दीड वर्षात सुमारे सव्वीस लाख रुपये खर्च केले. मात्र, आता पैशाअभावी उपचार थांबविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

मदन दामोदर ठोंबरे (रा. जामगाव, ता. मुळशी) या पित्याची हृदय पिळवटून टाकणारी ही कहाणी. त्यांचा बारावीत शिकणारा एकुलता एक मुलगा शैलेश (वय १९) याला १६ मे २०१८ रोजी टेंपोने धडक दिली. त्यात त्याच्या मज्जातंतूला धक्का बसला. त्याच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दोन महिने उपचार करण्यात आले. त्या वेळी ऑपरेशन व औषधोपचाराचा खर्च साडेआठ लाख रुपये झाला. मज्जातंतूला धक्का बसल्याने शैलेशच्या संवेदना हरपल्या आहेत. त्याला चालताच काय; पण उभेही राहता येत नाही. अंघोळ, जेवण, कपडे घालणे व इतर नित्यकर्मेही तो आई-वडिलांच्या मदतीशिवाय करू शकत नाही. दोघांपैकी एकाला त्याच्यासोबत कायम थांबावे लागते. बारावीत अतिशय हुशार असणाऱ्या शैलेशला यामुळे शिक्षणही थांबवावे लागले.

त्याची ही हतबलता बघून मदन ठोंबरे व त्यांच्या पत्नीच्या दुःखाला पारावर राहिला नाही. आधीच घरची परिस्थिती बेताची. त्यात या अपघाताने ते पुरते कोलमडून गेले. मात्र, आपणच हात- पाय गाळून बसलो तर सगळेच कुटुंबीय नैराश्‍यात जातील, त्यामुळे स्वतःचे अश्रू पुसत वेळीच त्यांनी स्वतःला सावरले. शैलेशवर उपचार करून, त्याला बरा करणारच, असा निर्धार त्यांनी केला आणि तेथूनच एका कणखर पित्याची एकाकी झुंज सुरू झाली. 

पुणे, पिरंगुट, पुणतांबे, कर्नाटक या ठिकाणी शैलेशवर उपचार करण्यात आले. अनेकदा तिथे त्यांना पंधरा दिवस किंवा महिनाभरही थांबावे लागायचे. या सगळ्या उपचाराचा शैलेशला फायदा होऊ लागल्याचे दिसून येत आहे. आता तो स्वतःच्या आधाराने उठण्याचा प्रयत्न करू लागलाय. काही महिन्यांतच तो चालण्याचा प्रयत्नही करू शकेल, अशी आशा मदन ठोंबरे यांना आहे. मात्र, पैशांची जुळवाजुळव करण्यात त्यांना अपयश आल्याने काळजावर दगड ठेवत त्यांनी उपचार थांबविण्याचा निर्णय 
घेतला आहे.   

‘आभाळच फाटलंय...’
मदन ठोंबरे हे सेंट्रिगवर मजुरीची कामे करतात. त्यांना दिवसाला तीनशे ते सहाशे रुपये मिळतात. त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मुलावरील उपचारासाठी त्यांनी शेजजमीन विकून पैसे उभारले. मात्र, आता मार्ग बंद झाल्याने त्यांनी मुलावरील उपचार थांबविण्याचा कटू निर्णय घेतला. ‘आभाळच फाटलंय, त्याला कुठं कुठं शिवणार’, अशी हतबल प्रतिक्रिया देत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.