कार्ला फाट्यावर भारतातील पहिल्या ‘टॅक्टिकल अर्बनिझम’चा प्रयोग
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील चौकाचौकांवरील जीवघेण्या अपघातांची संख्या कमी करण्यासह शून्य मृत्युदरासाठी सेव्हलाईफ फाउंडेशन प्रयत्न करीत आहे.
लोणावळा - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) चौकाचौकांवरील जीवघेण्या अपघातांची (Accidnet) संख्या कमी करण्यासह शून्य मृत्युदरासाठी सेव्हलाईफ फाउंडेशन प्रयत्न करीत आहे. यासाठी त्यांनी कार्ला फाटा येथे भारतातील पहिली ‘टॅक्टिकल अर्बनिझम’चा (Tactical Urbanism) प्रयोग केला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि स्कोडा ऑटो फोक्सवॅगन व सेव्हलाईफ फाउंडेशन, यांच्या सहकार्याने कार्लाफाटा येथे रस्ता क्रॉसिंग अधिक सुरक्षित करत व मार्गाची पुनर्रचना करत, टॅक्टिकल अर्बनिझमच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांना वळण्यासाठी किंवा मार्गास छेद दिल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. हे अपघात रोखण्यासाठी महामंडळातर्फे काही ठिकाणचे असुरक्षित छेदरस्ते बंद केले. मात्र, गावांच्या ठिकाणी असलेल्या छेद दुभाजकांमुळे झालेल्या अपघातांत अनेक दुदैवी बळी गेले आहेत. पादचारी, सायकलस्वार आणि वाहनचालकांसाठी रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी रस्त्यांची शहरी रचना, वाहतूक नियोजन आणि पायाभूत सुविधांमधील बदलांसाठी, सेव्हलाईफ फाउंडेशनतर्फे पुढाकार घेण्यात आला. महामार्गावरील छेद रस्त्यांचा दोन वर्षे अभ्यास करून सर्वेक्षण करण्यात आले.
कार्ला फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर ‘टॅक्टिकल अर्बनिझम’चा पहिला प्रयोग राबविण्यात आला. सेव्हलाईफ फाउंडेशन सध्या पादचारी, सायकलस्वार आणि इतर रस्ता वापरकर्त्यांसाठी सुरक्षितता सुधारण्यासाठी तात्पुरत्या रचनेची चाचणी घेत आहे. या चौकात पदपथ खराब झाले होते. महामार्गावर पादचाऱ्यांना थांबण्यासाठी जागा नव्हती आणि महामार्गावरील जंक्शन गावकरी वापरत असल्याने संघर्ष मोठ्या प्रमाणात होत होता. याठिकाणी वाढते अपघात व बळी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत उड्डाणपुलाची मागणीही केली होती.
यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय सहसंचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, ‘‘कार्ला फाट्यावर पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे मानवी जिवाला धोका कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे महामंडळाचे ध्येय आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील इतर चौकांमध्ये अपघात रोखण्यासाठी, अशी पद्धत वापरण्यात येईल.’’ रस्ता सुरक्षेला विकासासोबत जोडणे आवश्यक आहे. व्हीजन झिरो प्रोजेक्टसारख्या उपक्रमांद्वारे, छेदनबिंदू अधिक सुरक्षित करत. मुंबई-पुणे गजबजलेल्या मार्गावर होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप बोपाराय यांनी सांगितले.
रस्त्यावरील ब्लॅक-स्पॉट्स, अपघातप्रवण क्षेत्रात प्रवाशांचे जीव वाचविण्यासाठी राबविलेल्या योजना, अशा उपक्रमांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील मृतांमध्ये ५४ टक्के घट झाली आहे. ब्राझीलियन घोषणेनुसार रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याच्या वचनबद्धतेच्या दिशेने भारताचे एक पाऊल पुढे आहे.
- पीयूष तिवारी, सेव्ह लाईफ फाउंडेशन, मुख्य कार्यकारी अधिकारी
काय सांगतात आकडे...
कार्ला फाट्यावर पीक अवर्समध्ये तासाभरात सरासरी २५० पादचारी रस्ता ओलांडतात. ४,५०० वाहने पास होतात
२०१८ ते आक्टोबर २०२० या कालावधीत १८ गंभीर अपघात. यामध्ये १७ मयत आणि २३ गंभीर जखमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.