पुणे : विकासाला मिळणार हायस्पीडची जोड
नाशिक- पुणे आता पावणेदोन तासात, सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुसाट, ६४ गावांतील मोजणी पूर्ण अशा बातम्या सध्या सर्वत्र झळकत आहेत. चाकण औद्योगिक हब तसेच प्रस्तावित पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेचे चाकणजवळील कडाचीवाडी (ता. खेड) येथे होणाऱ्या स्थानकामुळे या परिसरातून औद्योगिक उत्पादित माल, वाहने, मशिनरीचे सुटे भाग, शेतीमाल वाहतूक तसेच प्रवाशांची ये- जा वाढणार आहे. या रेल्वेमुळे चाकण व परिसराचा विकास गतिमान होणार आहे.
- हरिदास कड, चाकण
नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी मोजणीचे काम सध्या प्रगती पथावर आहे. आतापर्यंत तब्बल १०१ गावांपैकी ६४ गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे हा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असल्याने त्याला गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांतून सेमी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. त्यासाठी नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील एक हजार ४७० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांशी विचार विनिमय करून आणि विश्वासात घेऊनच या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. त्यांना योग्य तो मोबदलाही देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या गावागावांत बैठका सुरू आहेत. या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत रेल्वे विभागाने प्रस्ताव दाखल केले आहेत. (Nashik-Pune semi high speed railway project)
भूसंपादनाबाबत रेल्वे विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा मार्ग पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्यांतून जाणार आहे. त्यासाठी ५७५ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातही भूसंपादन केले जाणार आहे. या कामासाठी जवळपास दीड हजार कोटींच्या निधींची गरज आहे. या प्रकल्पासाठीच्या मार्गिका मोजण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. आतापर्यंत ६४ गावातील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. साडेचार हजार सर्व्हे नंबरपैकी एक हजार सर्व्हे नंबरच्या सर्च रिपोर्टचे, तर पंचेचाळीस टक्के जिओ टेक्निकल सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, या मार्गाच्या कामाचा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा देखील घेतला आहे.
नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण २३५ किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण २४ स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक- पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत कापता येणार आहे, ही रेल्वे प्रतितास दोनशे किलोमीटर वेगाने धावणार आहे. नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोधही केला आहे. भूसंपादन करत असताना पोल्ट्री फार्म, घरे, बंगले, विहिरी, बागायती शेती, कूपनलिका संपादनात जाणार आहेत. त्यामुळे काही ठिकाणांहून शेतकऱ्यांनी या हायस्पीड रेल्वेच्या भूसंपादनाला विरोध केल्याचे दिसून आले. (total length of 235 km of railways will be laid for the high speed railway project)
पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी तसेच कामगार, प्रवासी व शेतीमाल यांची वाहतूक करण्यासाठी फायदेशीर आहे. या प्रकल्पाचे काम लवकर व्हावे, अशी उद्योजक, कंपनी मालक व सर्वांची अपेक्षा आहे.
- कैलास झाझरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, बजाज ऑटो कंपनी
पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेने चाकण औद्योगिक वसाहतीच्या व परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. इतर जमिनींच्या किमती वाढणार आहेत. तसेच इंडस्ट्रिअल जमिनीचे भाव वाढतील. चाकण रेल्वे स्थानकाचा फायदा औद्योगिक वसाहतीतील कामगार, उद्योजक यांना होणार आहे. तसेच कंपन्यांतील उत्पादित माल व कच्चा माल वाहतुकीसाठी होणार आहे.
- राजेंद्र गायकवाड, उद्योजक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.