बैलगाडा शर्यत Bailgada- Bullock Cart Race in Maharashtra
बैलगाडा शर्यत Bailgada- Bullock Cart Race in MaharashtraFile Photo Sakal

बैलगाडा शर्यतीचं आयोजन करायचंय! जाणून घ्या अटी, अर्ज कसा करावा?

Published on

प्राण्यांच्या, गाडीवानाच्या व प्रेक्षकांच्या सुरक्षेबाबत आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल.

मंचर : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे अनेक गावांनी बैलगाडा शर्यती आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पण, त्यासाठी न्यायालयाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. प्रत्येक शर्यतीकरीता बँक हमीच्या स्वरूपात किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरूपात ५० हजार रुपये ठेवीसह जिल्हाधिकाऱ्याकडे शर्तींचे हमीचे पालन करणारा अर्ज करावा लागणार आहे. (Bailgada sharyat how to apply terms and conditions explained)

अर्ज करण्याची पद्धत
- बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race in Maharashtra) आयोजन करणाऱ्यांना शर्यती भरविण्यापूर्वी किमान १५ दिवस अगोदर यासोबत जोडलेल्या अनुसूची ‘अ’ मधील नमुन्यानुसार प्रत्येक बैलगाडा शर्यतीकरीता बँक हमीच्या स्वरूपात किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरूपात ५० हजार रुपये ठेवीसह जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अधिकारी शर्यतीच्या ठिकाणाची तपासणी करतील. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा.
- अहवाल प्राप्त झाल्यावर नियमांतील शर्तीना अधीन राहून, बैलगाडी शर्यती आयोजित करण्याची परवानगी आयोजकास सात दिवसांच्या आत देतील.
- आयोजकाने शतींचे पालन केले नसल्याची खात्री पटली, तर परवानगी जिल्हाधिकारी रद्द करू शकतील.

या आहेत अटी (Bullock Cart Race terms in Maharashtra)
- एक हजार मीटरपेक्षा अधिक लांबीचे धावण्याचे अंतर नसावे.
- बैलांना किंवा वळूना धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान २० मिनिटे आराम द्यावा.
- एका गाडीवानास बैलगाडी चालविण्यास परवानगी असेल.
- बैलास काठीने मारणे अथवा पायाने मारणे अथवा चाबूक अथवा तत्सम उपकरणे अथवा अन्य साधनांचा वापर करण्यास प्रतिबंध असेल.
- शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलांच्या अथवा वळूच्या जोड्या वय, वजन, स्वास्थ आदीनुसार सुसंगत असाव्यात.
- शर्यतीकरिता वळू अथवा बैलांना इतर कोणत्याही प्रकारच्या प्राण्यासोबत जुंपण्यास प्रतिबंध असेल.
- वळू अथवा बैलांसाठी असलेल्या आरामाच्या जागेत पुरेसा आश्रय/निवारा, पुरेसे खाद्य, चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असावे.
- आरामाची जागा नीटनेटकी, स्वच्छ व आरोग्यदायी असावी.
- नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यवसायाची सेवा किंवा पशुरुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध ठेवावी.
- बैलांना कोणतीही वेदना किंवा यातना दिली जाणार नाही, याची खात्री करावी.
- प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा सोसायटी बैलगाडी शर्यतीच्या आयोजनावर देखरेख ठेवील आणि शर्यत शर्तीनुसार आयोजित केली असल्याची खात्री करील.
- शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या नावांचा अभिलेख, प्राण्यांचे स्वास्थ-नि-आरोग्यविषयक प्रमाणपत्र व शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्यांचा इतर तपशील ठेवावा.
- शर्यतीपूर्वी बैलांचे आरोग्यविषयक प्रमाणपत्र नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावे. प्रमाणपत्राची वैधता शर्यतीच्या दिवसासह ४८ तास इतकी असेल.
- शर्यतीप्रसंगी उत्तेजक द्रव्य, मादक पदार्थ, हानिकारक पदार्थ, इत्यादी, बैलांना दिले नसल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी करील.
- बैलांना थकवा, निर्जलीकरण, अस्वस्थपणा इत्यादी लक्षणे आढळून आल्यास शर्यतीमध्ये भाग घेता येणार नाही.

बैलांची व प्रेक्षकांच्या सुरक्षेची व्यवस्था
- शर्यतीच्या वेळी वैद्यकीय सेवा किंवा रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध असावी.
- शर्यतीच्या वेळी प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सावधगिरीच्या उपाययोजना केल्या आहेत, याची सुनिश्चित करील.
- धावपट्टीच्या दोन्ही बाजूस प्रतिबंधात्मक कठडे उभारील अथवा इतर सुरक्षेचे उपाय करावेत.
- शर्यतीदरम्यान गाडीवानास, बैलगाडीच्या चाकात व इतरत्र अडकून अपघात होऊ शकेल, अशा स्वरूपाचे कोणतेही सैल अथवा
तत्सम स्वरूपाचे कपडे परिधान करण्यास परवानगी नाही.
- प्राण्यांच्या, गाडीवानाच्या व प्रेक्षकांच्या सुरक्षेबाबत आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल.
- आयोजकांनी अहवाल, चित्रीकरण, सादर करावे.
- स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींची माहिती, शर्यतीचा पूर्तता अहवाल डिजिटल स्वरूपातील चित्रीकरण बैलगाडा शर्यत समाप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावे.
- बैलगाडी शर्यतीचे आयोजन हे अधिनियम आणि नियमांतील शर्तीनुसार झाले असल्याची खात्री पटल्यानंतर व आयोजकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत आयोजकाला ठेव रक्कम परत केली जाईल.

या कारणांमुळे ठेव होईल जप्त
- आयोजकांनी अधिनियम किंवा नियमांच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास स्पर्धेत भाग घेणाऱ्या व्यक्तींची माहिती, बैलगाडी शर्यतीचा पूर्तता अहवाल आणि संपूर्ण शर्यतीचे डिजिटल स्वरूपातील चित्रीकरण सादर करण्यात कसूर केली असेल.
- कोणत्याही व्यक्तीकडून किंवा प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या जिल्हा सोसायटीकडून स्पर्धा सुरू झाल्यापासून ४८ तासांच्या आत जिल्हाधिकाऱ्यास कोणत्याही शर्तीचा भंग झाल्याविषयीची तक्रार प्राप्त झाली असेल व आयोजकाने शर्तीचा भंग केला असल्याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांना पटली असेल.
(जिल्हाधिकारी तक्रार प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत निर्णय घेतील.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.