वारकऱ्यांसाठी १२० ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा
आळंदी, ता. ३० : कार्तिकी वारीत २४ तास विभागवार पाणीपुरवठा आणि आरोग्य कर्मचारी नेमून शहराची स्वच्छता रात्रपाळीतही केली जाणार आहे. वारकऱ्यांची सुरक्षा आणि इंद्रायणी घाटावरील चोऱ्या रोखण्यासाठी पालिकेच्यावतीने १२० ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारली. आपत्ती व्यवस्थापन आणि वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी सर्व शासकीय विभागाचे एकत्रित मध्यवर्ती नियंत्रण कक्ष पालिका कार्यालयात उभारले असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
वारी नियोजनाबाबत माहिती देताना केंद्रे यांनी सांगितले की, पाणीपुरवठा केंद्रावर मोटारींची दुरुस्ती पूर्ण केली. जलशुद्धीकरण केंद्रास पाणी शुद्धीकरणास आवश्यक साहित्यांची खरेदी केली. वारकऱ्यांसाठी पालिकेमार्फत वीस टँकर्स तैनात केली जाणार आहेत.
स्वच्छता
सिद्धबेट, नदी घाट, जुना व नवीन पूल यांच्यासह शहरातील खुरटी गवत काढणी व स्वच्छता केली.वारी कालावधीत पालिकेमार्फत दररोज तीन पाळ्यांमध्ये स्वच्छता केली जाणार आहे. गर्दीच्या दिवशी रात्रीच्या वेळीच स्वच्छता केली जाईल. तात्पुरत्या चारशे शौचालयांची उभारणी केली जाणार आहे.
दिवाबत्ती
शहरातील महत्त्वाच्या अठरा ठिकाणच्या हायमास्ट विद्युत खांबांची पालिकेमार्फत दुरुस्ती केली. तसेच २० ठिकाणी पुरेसा प्रकाश राहील असे नियोजन केले.
बांधकाम विभाग
शहरात अनेक ठिकाणी पोलिस विभागासाठी वॉच टॉवर, आरोग्य विभागासाठी वैद्यकीय मदत कक्षांची पालिकेमार्फत उभारणी केली जाणार आहे. इंद्रायणी घाटावर महिलांसाठी चेंजिंग रूम्स उभारल्या जाणार आहेत. महत्त्वाच्या रस्त्यांची, सार्वजनिक टॉयलेट्स, चेंबर्सची दुरुस्ती पूर्ण करून घेतली आहे. प्रदक्षणा मार्ग व इतर सर्व आवश्यक ठिकाणचे अतिक्रमण काढून अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा
पोलिस विभागास चोरीच्या घटनांवर लक्ष ठेवणे सोपे व्हावे. यासाठी पालिकेमार्फत शहरात एकशे वीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून यांची नियंत्रण कक्ष आळंदी पोलिस ठाणे कार्यालयात असणार आहे. यापैकी आजअखेर सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून तीन तारखेपर्यंत उर्वरित काम पूर्ण होणार आहे. यात्रा दर्शन होण्यासाठी विविध ठिकाणी तीन मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली जाणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन:
आळंदी नगरपरिषद, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या मिळून तीन अग्निशमन दलाच्या गाड्या वारी कालावधीत तैनात ठेवल्या जाणार आहेत.
नदी पात्रात कुणीही बुडू नये यासाठी तीन रेस्क्यू बोटही तैनात असणार आहेत.
कंट्रोल रूमची स्थापना
यात्रा कालावधीत पालिका, पोलिस, ग्रामीण रुग्णालय अशा सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून पालिका कार्यालयात कंट्रोल रूमची स्थापना केली जाणार आहे. पालिकेची सर्व विभाग तीन तारखेपर्यंत सुविधा देण्यासाठी सज्ज असतील, असे केंद्रे यांनी सांगितले.
03923, 03926
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.