भारत जपान, जर्मनीलाही मागे टाकणार
बारामती, ता. २३ : ‘‘जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करत असून, महाराष्ट्र सरकार यात प्रयत्न करीत आहे. पाच ट्रिलियन कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असून, ते साध्य केल्यास भारत बलाढ्य अशा जपान व जर्मनीलाही मागे टाकू शकतो,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती सहकारी बँकेच्या ६२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अनेक जिल्हा सहकारी बँकात कर्ज देताना कठोर भूमिका न घेतल्याने बँका अडचणीत आल्या आहेत, वन टाइम सेटलमेंट सर्वच प्रकरणात करणे शक्य नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
रिझर्व्ह बँकेकडून नागरी सहकारी बँकांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. तसेच, रिझर्व्ह बँकेकडून सर्वच व्यवहारांवर कडक नजर ठेवली जात आहे. त्यामुळे या पुढील काळात सर्वच बँकांना आर्थिक शिस्त पाळावीच लागणार आहे.’’
बारामती बँकेने एनपीए तीन टक्क्यांच्या आत व पुढील सभेपर्यंत शून्य टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना दिली. पुढील सभेत दोन आकडी लाभांश देणार असाल तरच सभेला येईन, असेही अजित पवार यांनी नमूद केले. कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी दबाव आणू नये, अन्यथा ज्या गावात शाखा होतील, तेथील कर्मचारी भरती केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
कार्यकारी संचालक रवींद्र बनकर यांनी कार्यक्रमपत्रिकेचे वाचन केले, उपाध्यक्ष किशोर मेहता यांनी आभार मानले. या प्रसंगी तैनूर शेख, करीम बागवान, संभाजी माने, ज्ञानदेव बुरुंगले, बाबूराव कारंडे, अँड. प्रभाकर बर्डे, सूर्यकांत गादिया, प्रदीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
बँकेला ८.४५ कोटींचा नफा
बँकेचा एनपीए १४.८५ टक्क्यांवरून ७.६५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. डिसेंबरपर्यंत हा एनपीए तीन टक्क्यांवर आणू, पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत हाच एनपीए शून्य टक्क्यांवर आणला जाईल, अशी ग्वाही सचिन सातव यांनी दिली. बँकेला ८.४५ कोटींचा नफा झाला असून ठेवी २३८४ कोटी, तर कर्जे १४०५ कोटींवर गेल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.