कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे कोंडतोय श्‍वास

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे कोंडतोय श्‍वास

Published on

चाकण, ता.१९: खराबवाडी, वाघजाईनगर (ता. खेड) ग्रामपंचायत हद्दीतील वनविभागाच्या जागेत अनधिकृत कचरा डेपो आहे. चाकण नगरपरिषद व इतर ग्रामपंचायत परिसरातील कचरा येथे टाकला जातो. रात्री बाराच्या पुढे हा कचरा डंपरद्वारे येथे टाकला जातो. हे डंपर ग्रामस्थांनी अनेकवेळा पकडले आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील कचऱ्यात भरच पडत आहे. यामुळे बिरदवडीच्याही ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले. कचरा जाळल्यामुळे होणारे प्रदूषण तसेच दुर्गंधीमुळे नागरिकांचा श्‍वास कोंडत आहे. यामुळे श्‍वसनाचे आजार बळावत आहेत.

कचरा डेपोकडे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष देऊन तो त्वरित हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. काही अधिकारी, कर्मचारी पैसे घेऊन येथे तालुक्याबाहेरचा कचरा टाकतात. तो रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे, असे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर शिळवणे, शैलेश फडके आदींनी सांगितले.

कचऱ्यामुळे वाघजाईनगर, बिरदवडी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना डोळे, कान, घसा आणि श्वसनाचे आजार होत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे. कचरा येथे टाकण्याबाबत प्रशासन, मुख्याधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे स्थानिक वैतागले आहेत.

पोलिस, नगरपरिषदेचे कार्यवाही करण्याची मागणी
खराबवाडी, वाघजाईनगर येथील कचरा डेपो अनधिकृत आहे. हा कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेकवेळा आंदोलन करण्यात आले होते. मी उपोषण केले होते.त्यावेळी कचरा डेपो हलवण्यात येईल असे आश्वासन तत्कालीन अधिकाऱ्यांनी दिले होते.तरीही हा कचरा डेपो हलवण्यात आला नाही. येथे काही जण पैसे घेऊन पिंपरी -चिंचवड, हिंजवडी परीसरातील प्रदूषित,रासायनिक, घाण कचरा डंपरमधून आणून टाकतात. रात्रीच्या वेळी गाड्या येतात डंपर येतात. काही गाड्या स्थानिक नागरिक पकडतात. बेकायदा कचरा आणणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. नगरपरिषदेने कारवाई करावी, अशी मागणी खराबवाडीचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर शिळवणे यांनी केली आहे.

खराबवाडी, वाघजाईनगर परिसरात कचरा डेपो आहे. या परिसरातील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने येथील हवेची गुणवत्ता यापूर्वी तपासलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी कचरा कोणी पेटवत असेल तर तो कचरा पेटवू नये असे संबंधितांना तसेच प्रशासनाला सांगितले आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड परिसरातून कोणी कचरा आणून टाकत असेल तर पोलिसांनी, नगरपरिषदेने त्यावर कारवाई करावी.
- नितीन गोरे, सदस्य, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

कचरा डेपो फक्त चाकण नगर परिषदेचा नाही. परिसरातील इतर ग्रामपंचायतीही मोठ्या प्रमाणात येथे कचरा टाकतात. पिंपरी-चिंचवड येथील काही व्यक्ती येथे कचरा ठाकतात. याबाबत पोलिसांनाही आम्ही कारवाई करण्यासाठी सांगितले आहे. डेपोची जागा नगरपरिषदेच्या मालकीची नाही. वनविभागाच्या वतीने चाकण नगरपरिषदेला कचरा डेपोसाठी स्वतंत्र दोन हेक्टर जागा चाकण-आळंदी मार्गाच्या परिसरात मिळणार आहे.
- सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी, चाकण नगर परिषद

06147

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.