मंचर भीमाशंकर राज्यमार्गाची दूरवस्था
घोडेगाव, ता. २४ : मंचर ते भीमाशंकर राज्यमार्गावर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छोटे मोठे खड्डे पडले आहेत. यावर्षी झालेल्या नवीन रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचले आहे. भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
या ५५ किलोमीटरच्या रस्त्यावर जुलै व ऑगस्ट महिन्यात वाहनांची गर्दी असते. श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देश व राज्यभरातून भाविक येत असतात. श्रावणात दर सोमवारी व तसेच शनिवार, रविवार या रस्त्यावर गर्दी होते. मंचरपासून भीमाशंकरच्या गाडीतळापर्यंत वाहने धावत असतात. दरवर्षी या रस्त्यावर डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च होतात. काही ठिकाणी रस्त्याचे नवीन डांबरीकरण होते. परंतु पावसाळा सुरू झाला की एक महिन्यात खड्डे पडायला सुरूवात होते. यात छोटे मोठे अपघात होतात. रस्ते दर्जेदार करा, असे लोकप्रतिनिधी सांगतात. पण ठेकेदार व अधिकारी याला दाद देत नसल्याचे चित्र गेली अनेक वर्षे आहे, असे येथील नागरिक सांगतात.
मंचर ते भीमाशंकर या रस्त्यावर छोटी वळणे काढणे गरजेचे आहे. लांडेवाडीजवळील शेवाळवाडी येथे रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे पडले आहेत. जवळच असणाऱ्या भैरवनाथ मंदिर परिसराचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा झाला आहे. मात्र पुलाजवळ दोन्ही बाजूने बॅरिकेड नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. घोडेगावजवळील हरिश्चंद्र मंदिराजवळ असणाऱ्या पुलाजवळ कायम रस्त्यावर पाणी असते. अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाणी काढून देण्याची सोय केली नाही. जास्त पाणी साचल्यास कठडा वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. शिनोली व डिंभा येथे नागरिक व पर्यटक रस्त्यावर गाड्या लावत असल्याने वाहतूक कोंडी होते. डिंभे ते भीमाशंकर दरम्यान अनेक ठिकाणी झाडेझुडपे वाढून रस्त्यावर आली आहेत. दाट धुके असल्याने रिफ्लेक्टरची गरज आहे. परंतु हे काम अपूर्ण आहे. दिशा दर्शक फलक नसल्याने पर्यटक व भाविकांची दिशाभूल होते.
पोखरी घाटात दरड पडणे बंद झाले असले तरी गटार तुंबत असल्याने रस्त्यावर पाणी येते. त्यामुळे खड्डे पडले आहेत. राजपूर गावाजवळील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तळेघर ते भीमाशंकर या भागातील ५ किलोमीटर अंतरावर छोटे-मोठे खड्डे पडल्याने वाहनांची गती मंदावते व वाहतूक कोंडी होते.
घोडेगाव ते पोखरी येथे ५ कोटी रुपयांचा निधी तर पोखरी ते तळेघर यासाठी ५ कोटींचा निधी मागील दोन वर्षांत खर्च झाला आहे. येथील छोटे मोठे खड्डे दुरुस्त करू. पोखरी घाटातील गटारे मोकळी केली जातील. आवश्यक त्या ठिकाणी रिफ्लेक्टर बसवू. डिंभे येथील वाहतूक कोंडी कशामुळे होते, याबाबत पाहणी केली जाईल. मंचर ते भीमाशंकर हा रस्ता कायम खड्डेमुक्त राहील, यासाठी नियोजन केले जाईल.
- पठाडे, सार्वजनिक बांधकाम विभाग
जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांत पावसाचा जोर असतो. घोडेगाव येथील भीमा हरिश्चंद्र मंदिराजवळील पुलावर कायम पाणी साचलेले असते. वाहने यातून गेल्यानंतर पाणी उडून नागरिकांच्या अंगावर चिखल उडतो. पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
- कपिल काळे, स्थानिक नागरिक
............
बातमीदार - चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.