विकासकामांच्या चर्चेमुळे राहूल कुल विजयी रमेश वत्रे ः सकाळ वृत्तसेवा
केडगाव, ता. २३ ः दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राहुल कुल यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक झाली आहे. आमदार राहुल कुल यांच्या मंत्रिपदाकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. आमदार राहुल कुल यांनी १३ हजार ८८९ एवढे मताधिक्य घेत रमेश थोरात यांचा पराभव केला आहे. कुल यांनी तालुक्यात केलेली विकासकामे, आरोग्य दूत म्हणून केलेले काम, लाडकी बहीण योजना, भीमा पाटस साखर कारखाना सुरू करणे, या प्रमुख मुद्यांमुळे कुल यांचा विजय झाला आहे.
शरद पवार यांच्या माध्यमातून थोरात यांनी कुल यांच्या पुढे आव्हान तयार केले होते. बंडखोरी होऊ नये म्हणून शरद पवार यांनी पूर्ण काळजी घेतल्याने थोरात यांना शेवटपर्यंत उमेदवारीसाठी ताटकळत राहावे लागले. याउलट राहुल कुल यांना भाजपच्या पहिल्या यादीत कुल यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी प्रथमपासूनच प्रचारात आघाडी घेतली. रमेश थोरात यांनी चार मोठ्या सभा घेतल्या, तर कुल यांनी दोन मोठ्या सभा घेतल्या. सभांच्या नियोजनात रमेश थोरात अडकून पडले. या उलट कुल यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करत कुल यांचा प्रचार केला.
खासदार नीलेश लंके यांनी प्रचारादरम्यान राहुल कुल यांना चौकात समोरासमोर बसून विकासकामांबाबत चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. कुल यांनी हे आव्हान स्वीकारले, परंतु थोरात यांनी हे आव्हान स्वीकारले नाही. कुल यांना हे आव्हान देऊन लंके यांनी थोरात यांची एक प्रकारे गोची केली होती. शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या वरवंड येथे एकाच मैदानावर एक दिवसाच्या फरकाने सभा झाल्या. शरद पवार यांच्या सभेतील गर्दीचे रूपांतरण मतदानात झाले नाही. किंबहुना थोरात यांनी ही सभा जिंकता आली नाही. याउलट फडणवीस यांच्या सभेला मोठी गर्दी व ही सभा कुल यांनी जिंकली. एकूण सहा प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी थोरात यांना पाठिंबा दिला. सरळ लढतीमुळे थोरात यांना फायदा होईल, अशा भ्रमात थोरात यांचे कार्यकर्ते राहिले. याच मुद्द्यावरून कुल यांच्या कार्यकर्त्यांनी चिकाटी दाखवली. सरळ लढत, शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती, जातीय समीकरणे, गद्दारी, संविधान बदल, भीमा पाटसचा मुद्दा, यामुळे भलेभले सावधपणे अंदाज वर्तवत होते. रमेश थोरात यांच्या भाषणातून कधीही दौंड तालुक्याचे व्हीजन दिसले नाही. राहुल कुल यांची बदनामी हाच त्यांचा प्रचारादरम्यान अजेंडा राहिला. मी पुणे जिल्हा बँकेत किती चांगले काम केले, हे सांगण्याचा प्रयत्न थोरात यांनी केला, पण तो मुद्दा मतदारांना भावला नाही. त्यातच त्यांच्या सभेतून नारळ लावून तालुक्याचा विकास करा, असा संदेश दिला. त्यात कुल यांच्या कार्यकर्त्यांनी थोरात यांना खूप लक्ष्य केले.
भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, महेश भागवत, गुरुमुख नारंग, दौंडमधील रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्यामुळे कुल यांचा विजय सुकर झाला. दौंडमधील कत्तलखान्यामुळे कुल यांना ट्रोल केले होते. मात्र, मतदारांनी हा मुद्दा दुर्लक्षित केला.
भीमा पाटसचा मुद्दा चालला नाही
रमेश थोरात यांनी आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत भीमा पाटसचा मुद्दा उपस्थित केला. २००९ मधील विधानसभा निवडणूक वगळता थोरात यांना एकाही निवडणुकीत यश आले नाही. २०१९ ला कारखाना बंद असताना मतदारांनी कुल यांना विजयी केले होते. यंदा तर कारखाना सुरू आहे. त्यामुळे कुल यांना भीमा पाटसचा मुद्दा चालणार नाही, याची खात्री होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.