समस्यांवर मात करत फुलविली पिता-पुत्रांनी ''पॅशन फ्रूट''ची फळबाग
काटेवाडी, ता. १६ : कचरवाडी (ता. इंदापूर) येथील पांडुरंग बरळ व अमर बरळ या पिता-पुत्राने विदेशी फळांवर आपल्या शेतीमध्ये यशस्वी प्रयोग केला. अनेक समस्यांवर मात करत ब्राझीलच्या पॅशन फ्रुटची फळबाग फुलविली. यातून त्यांनी शेतकरी हाच खरा संशोधक असतो, हे सिद्ध करून दाखविले. उत्पादनच नव्हे तर ऑनलाइन मार्केटचा अभ्यास करून स्वतःचा ब्रँड तयार केला व ऑनलाइन मार्केटवर विकण्याची तयारीही केली आहे.
सध्या पुणे येथील बाजारात ९० ते १२० रुपये किलो असा या फळाला दर मिळत आहे. मद्य विक्री व्यवसायामध्ये या फळाच्या रसाचा वापर करून कॉकटेल बनवले जाते. उच्चभ्रू ग्राहकांकडून याला मोठी मागणी आहे. तसेच एक आरोग्यदायी ज्यूस म्हणून देखील सर्वसामान्य ग्राहकांकडून या फळाची मागणी होते. त्यामुळे पाऊण एकरातून पांडुरंग बरळ यांना साडेतीन ते चार टन उत्पादन अपेक्षित आहे.
पारंपरिक शेतीचा फाटा देत शेतीत नवनवे यशस्वी प्रयोग करणारे शेतकरी हे खऱ्या अर्थाने कृषी विकासाचे आदर्शवत मॉडेल आहेत. नफ्या तोट्याचा विचार न करता वेगवेगळ्या वाटा धुंडाळून इतर शेतकऱ्यांसाठी नवीन पर्याय बरळ यांनी ठेवले आहेत. पॅशन फ्रूट हे ब्राझीलचे फळ. आता विदेशी फळ म्हटले, की त्याच्या अभ्यास करायला हवा. त्यासाठी पोषक वातावरण, जमिनीचा पोत आवश्यक ते मार्गदर्शन यांचा विचार करून बरळ यांनी पॅशन फ्रूट लागवडीकडे मोर्चा वळवला. ते लाल रंगापासून पिवळ्या आणि सोनेरी रंगात बदलते. हे ळ चवीला आंबट-गोड असते.
फळातील पोषकतत्त्वे
*कार्ब्स,
* पोटॅशियम
* सोडियम
* व्हिटॅमिन सी, ए, डी, के, ई.
* लोह
*फॉस्फरस
* अँटिऑक्सिडंट्स
* बीटा-क्रिप्टोक्सॅन्थिन
* अल्फा-कॅरोटीन
येथेही होते उत्पादन
* नागालँड
* केरळ
* कर्नाटक
* मिझोराम
* मेघालय
अशी केली लागवड
* किसान गड राजस्थान येथून पॅशन फ्रुटची रोपे आणली.
* साडेतीन गुंठ्यांमध्ये रोपांची लागवड
* रोपांपासून मिळालेल्या फळांच्या बियांद्वारे तयार केलेली ४१० रोपे
* दोन लाख ४० हजार रुपये खर्च करून स्टेजिंगची निर्मिती
* १६ हजार रुपयांची रोपे, आठ हजाराचे बांबू असा सुरुवातीला खर्च
कीटकनाशकांच्या फवारणी ऐवजी सापळ्यांवर भर
पॅशन फ्रूट वर कीटकनाशकांच्या फवारण्या अजिबातच नाहीत. या फळाला फक्त फळमाशीची समस्या आहे. त्यामुळे फळमाशीचे सापळे या बागेमध्ये लावले जातात. फळमाशीवर एखादे कीटकनाशक फवारल्यास तिथे मधमाशी येत नाही. त्यामुळे सहाजिकच परागीभवनाअभावी फलधारणा कमी होते. त्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणी ऐवजी सापळ्यांवर पांडुरंग बरळ यांनी जोर दिला आहे.
मधूमेहासाठी फळ फायदेशीर
मधूमेह असणाऱ्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर मानले जाते. हे इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यातील पोटॅशियम तसेच इलेक्ट्रोलाइट हे घटक हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते. ते खाल्ल्याने हृदय आपले कार्य अधिक चांगले करते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. पॅशन फ्रूटमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी कार्य करते. तसेच हे फळ लोहयुक्त असल्याने, शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.याच्या नियमित सेवनाने अॅनिमियाचा त्रास होत नाही.
पॅशन फ्रुटवर शेणखतामुळे फळावर एक प्रकारची चकाकी येते. पाऊण एकरामध्ये लागवड करत असताना दहा बाय सातवर रोपे लावली. ठिबक सिंचनचा वापर करत पुरेसे पाणी फळबागेला उपलब्ध करून दिले. फूल लागल्यापासून फळ तयार होईपर्यंत चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर पुढील चार महिने या बागेतील फळे विक्रीसाठी उपलब्ध होतात.
- पांडुरंग बरळ, पॅशन फ्रूट उत्पादक
पुणे येथील बाजारासह, अमेझॉन, बिग बास्केट, रिलायन्स मॉल आधी ठिकाणी विक्री करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ॲग्रोवन फार्म हा ब्रँड तयार केला आहे. या फळाचा टीपिंग पिरेड हा दहा ते बारा दिवसांचा आहे. (या फळाची साल जाड असल्यामुळे फळ वेलीपासून तोडल्यानंतर आरामात दहा ते बारा दिवस टवटवीत राहते ) त्यामुळे सहाजिकच ऑनलाइन मार्केटमध्ये या फळाला चांगला दर मिळू शकतो.
- अमर बरळ, पॅशन फ्रूट उत्पादक
00080, 00079
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.