nira river mahavitaran employee flood
nira river mahavitaran employee floodesakal

Pune Neera Flood: साहसाला सलाम! नीरा नदीच्या पुरात मारली उडी अन् पोहत जाऊन सुरळीत केला वीज पुरवठा

Mahavitaran Employee Ventures into Neera River Flood: पाण्याच्या प्रवाहाला वेग जास्त असल्याने वीज कर्मचाऱ्यांना तिथपर्यंत जाता येत नव्हते. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता अरविंद अंभोरे यांना कळविल्यावर अंभोरे व सेवा निवृत्त वीज कर्मचारी केशव बांदल यांनी बिघाडस्थळी जाऊन पाहणी केली
Published on

महुडे, ता. २७ ः महावितरणच्या भोर ग्रामीण २२ केव्ही फिडरवर बिघाड झाल्याने सोमवारी (ता.२६) पहाटेपासून वडगाव डाळ, उत्रौली, वेनवडी, पोंबर्डी, शिरवली, वाठार, पिसावरे, नांदवाव गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. नीरा नदीतील वीज वाहिनीवर बांबू पडल्याने वीज खंडित झाला. बंडू डोंगरे याने पोहत जाऊन बांबू काढल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला.

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा अडथळा येत असल्याने बिघाड सापडत नव्हता. परंतु, अशा परिस्थितीतही महावितरणाच्या कर्मचारी नागेश बांदल, नितीन तारू, संदीप प्रचंड व अक्षय शेटे यांनी बिघाड शोधून काढला. भाटघर पॉवर हाऊस शेजारी नीरा नदीत असलेल्या वीज वाहिनीवर काटेरी बांबू पडले होते. परंतु, भाटघर धरण क्षेत्रात दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या विद्युत गृह व सांडव्यातून सकाळी सात वाजल्यापासून ११ हजार ४३१ क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सुरू होता. मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने वीज लाईनवर पडलेल्या बांबूचे ठिकाण पाण्याच्या प्रवाहात होते.

पाण्याच्या प्रवाहाला वेग जास्त असल्याने वीज कर्मचाऱ्यांना तिथपर्यंत जाता येत नव्हते. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता अरविंद अंभोरे यांना कळविल्यावर अंभोरे व सेवा निवृत्त वीज कर्मचारी केशव बांदल यांनी बिघाडस्थळी जाऊन पाहणी केली. लाईनवर बाबू पडलेले ठिकाण धरणातून सोडलेल्या पाण्यात असल्याने तेथे जाणे अवघड होते. याच वेळी संगमनेर येथील पोहण्यात तरबेज असलेला तरुण श्रीकांत ऊर्फ बंडू डोंगरे महावितरणाच्या मदतीला धावून आला.

अंभोरे व बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली वीज प्रवाह बंद केला. त्यानंतर त्या तरुणाने कमरेला कोयता बांधून पाण्यात पोहत जाऊन विजेच्या लाईनवर पडलेल्या बांबू बेटा शेजारी असलेल्या लाकडाच्या खोडाचा आसरा घेत बांबू तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात पाण्याची खोली जास्त व वाहत्या पाण्याच्या वेगाचा अडथळा निर्माण होत होता. अशा परिस्थितीतही डोंगरे हा तासाभराच्या प्रयत्नानंतर विजेच्या लाईनवर पडलेले बांबू तोडून पोहत बाहेर आला. यावेळी अंभोरे, बांदल, वीज कर्मचारी तसेच रवी जांभळे, प्रदीप बांदल नदीतीरावर उपस्थित होते. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. धाडसी बंडू डोंगरे सह भरपावसात कर्तव्य बजावणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे‌.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...