अल्पभूधारक शेतकऱ्याचे घर भस्मसात

अल्पभूधारक शेतकऱ्याचे घर भस्मसात

Published on

नारायणगाव, ता.१५ : पिंपळगावतर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील वाणीमाळा शिवारातील अल्पभूधारक शेतकरी गोपीनाथ गोविंद बोऱ्हाडे यांच्या घराला लागलेल्या आगीत प्रापंचिक साहित्य, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोंबड्यांचे खुराडे, गाईचा गोठा जळून भस्मसात झाला. आगीत कडकनाथ जातीच्या पन्नास कोंबड्या मृत झाल्या असून, एक गाय गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (ता.१४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनास्थळी गाव कामगार तलाठी बी.टी.पंडित यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. बोऱ्हाडे यांना एक एकर शेती असून वाणी मळा येथे त्यांचे चार खोल्यांचे घर होते.दूध विक्री, कुक्कुटपालन, शेतमजुरी आदी व्यवसाय करून हे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहे. घरातील सर्व दहा सदस्य शेतीच्या व इतर कामानिमित्त बाहेर असताना
सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घराला आग लागली. त्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला यामुळे घरावरील छपरावरचे पत्रे उडून गेले. स्फोटामुळे आगीचा भडका उडाला. आगीत घरातील भांडी, कपाटे, फ्रिज, टीव्ही, कपडे, एक तोळा सोन्याचे दागिने जळून भस्मासात झाले. आगीत पन्नास कडक नाथ जातीच्या कोंबड्याही मृत झाल्या. भाजल्याने गोठ्यात बांधलेली एक दुभाती गाय गंभीर जखमी झाली तर एक वासरू किरकोळ जखमी झाले.

शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली. आगीत राहते घर व घरातील साहित्य भस्मसात झाल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. स्वयंपाक करायला भांडी व घालण्यासाठी कपडे सुद्धा शिल्लक राहिली नाहीत.
- बी.टी.पंडित, गाव कामगार तलाठी

राहते घर व प्रापंचिक साहित्य पूर्ण जळाल्याने अल्पभूधारक असलेले गोपीनाथ बोऱ्हाडे यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने प्रापंचिक साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांना तातडीच्या आर्थिक मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्ती व शासनाने त्यांना तातडीने मदत करून कुटुंबाला आधार द्यावा.
- राजेश गावडे पाटील, अध्यक्ष, श्रीकृष्ण पतसंस्था, पिंपळगावतर्फे नारायणगाव)


05701

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.