Shirur Loksabha Result
Shirur Loksabha Resultsakal

Shirur Loksabha Result : ‘शिरूर’मधील आमदारांची धाकधूक वाढली

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळविला आहे.
Published on

शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळविला आहे. लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीवेळी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून थेट खासदार बनलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांची स्वतंत्र राजकीय नेता म्हणून पहिली निवडणूक होती. ही त्यांनी केवळ जिंकली नाही, तर राजकारणात ते दीर्घकाळ राहतील, असा संदेशही या निकालाने दिला आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आणि शरद पवार यांच्या पक्षाचा जिल्ह्याचा आणि राज्याचा चेहरा म्हणून डॉ. कोल्हे ठळकपणे पुढे आले आहेत. मतदारसंघातील प्रस्थापित राजकीय नेत्यांना त्यांचा विजय हा मोठा धडा आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासह न जाता शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा डॉ. कोल्हे यांचा निर्णय निव्वळ भावनिक नव्हता, त्यात परिस्थितीची जाणीव झालेल्या राजकीय नेत्याचे ते शहाणपण होते. भविष्यातील राजकीय वाऱ्याचा नेमका अंदाज होता.निवडणूक निकालात कोल्हे यांचे मताधिक्य पाहता त्यांची वाटचाल परिपक्व नेतृत्वाकडे सुरू झाली आहे, असे मानायला हरकत नाही. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात सहापैकी केवळ एक आमदार सोबतीला असताना त्यांनी ही निवडणूक ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे कधीही झुकू दिली नाही. पाच अनुभवी नेते आणि विरोधात ताकदीची महायुतीची यंत्रणा अशा परिस्थितीतही त्यांनी विजय मिळवला. मतदारसंघाच्या विकासाचे व्हीजन, प्रभावी वक्तृत्व शैली, आधुनिक प्रचार तंत्राचा वापर आणि स्वतः दिवसरात्र राबून केलेले सूक्ष्म नियोजन ही कोल्हे यांच्या यशाची चतुःसूत्री आहे. 

शिवाय या निवडणुकीत डॉ. कोल्हे यांनी मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मोठी आघाडी घेतली आहे. या निकालाचे परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणार आहेत. डॉ. कोल्हे यांचा वैयक्तिक करिष्मा आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती या घटकांचा या निकालात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपली आमदारकी राहणार की जाणार, या भीतीने या मतदारसंघातील विरोधी आमदारांची धाकधूक वाढली आहे. 

शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, भोसरी आणि हडपसर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे या विजयाने ॲड. पवार यांची शिरूर विधानसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. उर्वरित पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आहेत. यामध्ये आंबेगाव, खेड, जुन्नर आणि हडपसर या चार मतदारसंघाचा समावेश आहे. तर, भोसरीमध्ये भाजपचे आमदार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार आणि भाजपचा एक, असे पाच आमदार एका बाजूला असल्याने महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या विजयाचे कागदावरील गणित जुळत असतानाही ‘कागदावर प्रभाव पण प्रत्यक्षात बेबनाव’ या स्थितीमुळे महायुतीला शिरूरची जागा गमवावी लागली. महायुतीच्या या पराभवामुळे या मतदारसंघातील दिग्गज आमदारांची भावी वाटचाल मात्र खडतर झाली आहे.

प्रस्थापितांची डोकेदुखी वाढणार
लोकसभा निवडणूक निकालाचे गडद सावट आगामी विधानसभा निवडणुकांबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुकांवर पडणार असल्याचे स्पष्ट चित्र असून, छोटछोट्या सुभ्यांच्या सुभेदारांनी या निवडणूक निकालाच्या केलेल्या उत्स्फूर्त जल्लोषाची किनार आगामी निवडणुकांच्या तोरणांना आतापासूनच दिसू लागली आहे. या नव्या चेहऱ्यांचा वाढत चाललेला अतिउत्साह मात्र प्रस्थापितांची डोकेदुखी वाढविणारा ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()