आंदोलनांमुळे तापले इंदापूरचे वातावरण
इंदापूर, ता. १८ : तालुक्यातील खडी क्रशर विरोधात जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी तहसील कार्यालयावर पुकारलेल्या ‘डेरा’ आंदोलन, तसेच आमदार दत्तात्रेय भरणे यांची बदनामी केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. १८) राष्ट्रवादी कार्यालय ते इंदापूर तहसीलदार कचेरीदरम्यान भव्य मोर्चा काढत प्रतिआंदोलन केले. या आंदोलनास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानेही पाठिंबा दिला होता. तर, आंदोलनासाठी येत असलेल्या खूपसे यांना पोलिसांनी पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर थांबवीत त्यांना परत पाठवले. या सर्व प्रकरणामुळे इंदापूर शहरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.
खुपसे यांनी इंदापूर तालुक्यातील गौण खनिज उत्खननाच्या विषयावर इंदापूरचे लोकप्रतिनिधी व प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानुसार सोमवारी डेरा आंदोलन करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर इंदापूर राष्ट्रवादीने आमदार भरणे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. त्यांनी तालुक्यातील २२ दुष्काळी गावांकरिता मंजूर केलेल्या पाण्याला खुपसे यांनी विरोध करत तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा आंदोलन केले. त्यात इंदापूर शहरासह तालुक्यातील पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात खूपसे यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलिस प्रशासनाने खूपसे व त्यांच्या कार्यकर्त्यांना पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या भीमानगर (ता. माढा) येथे थांबवून इंदापूर शहरात प्रवेश नाकारला. या वेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी खूपसे यांच्याशी चर्चा करीत १७ ऑक्टोबर रोजी खडी क्रशरबाबतच्या संदर्भात बैठक घेण्याचे नियोजित केले.
दरम्यान, दोन्ही ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पथकाने चौक बंदोबस्त ठेवला होता.
उजनीतून होणाऱ्या पाणी योजनेला विरोध करीत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चुली विझविण्याचे पाप खुपसे यांनी राजकीय सूडबुद्धीने केले असून, तसेच खडी क्रशरबाबत आमदार भरणे यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याने तालुक्याचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची भावना अतिशय तीव्र असून, खुपसे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- हनुमंत कोकाटे, अध्यक्ष, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस
प्रशासनावर प्रचंड दबाव असल्याने आमच्या ‘डेरा’ आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली. अनेक शेतकऱ्यांनी खडी क्रशर विरोधात माझ्याकडे केलेल्या तक्रारीमुळे मी आंदोलन करणार आहे.
- अतुल खूपसे, अध्यक्ष, जनशक्ती संघटना
SHS23B04703
SHS23B04704
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.