एकीकडे स्वयंपाकाचा धूर; दुसरीकडे ‘अआई’चा सूर

एकीकडे स्वयंपाकाचा धूर; दुसरीकडे ‘अआई’चा सूर

Published on

सोमेश्वरनगर, ता. ७ ः काही मुलं फडात राबायची, काही कोपीवरचा संसार सांभाळायची, काही छोट्या भावंडांना सांभाळायची तर काही वाढे विकायची. ऊसतोडणी मजुरांच्या अशा स्थलांतरित मुलांपासून शाळा दूर दूर उभी होती. येथील सोमेश्वर कारखान्याने त्यांच्यासाठी ''कोपीवरची शाळा'' हा अभ्यासवर्ग सुरू केला आणि शाळेची वेळ बदलून सायंकाळी पाच ते नऊ अशी केली. यामुळे चालू साखर हंगामात तब्बल २७८ मुले या अभ्यासवर्गात शिकली.
राज्यातील २१० कारखान्यांवर स्थलांतरित होणाऱ्या मजुरांसोबत त्यांच्या एक ते दीड लाख मुलांचे शिक्षण खंडित होत आहे. येथील सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळाने मात्र गत हंगामापासूनच त्यांच्या शिक्षणासाठी ''कोपीवरची शाळा'' अभ्यासवर्ग सुरू केला. चालू हंगामातील सर्वेक्षणात ० ते १८ वयोगटातील ४५९ मुले आढळली. त्यामध्ये ० ते ६ वयोगटाची १८१, ६ ते १४ वयोगटाची २२० तर १५ ते १८ वयोगटाची ५८ मुले होती. अंगणवाडीच्या मुलांना प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत पोषण आहार मिळविला. १५ वर्षांपुढील मुलांचा वर्गाप्रमाणे अभ्यास घेतला. तर ''आरटीई''च्या ६ ते १४ वयोगटातील मुलांची सुरवातीलाच चाचणी घेऊन लेखन-वाचन स्तरनिश्चिती केली. कारखान्याने मानधन तत्त्वावर सात अनुभवी शिक्षक नेमले. त्यांनी स्तरनिहाय गट करून मुलांना शिक्षण दिले. पहाटे बाहेर पडलेले पालक आणि मुलं दुपारी चार-पाचपर्यंत कोप्यांवर पोचायची. हातपाय धुवून मुलं अभ्यासवर्गाला यायची. गेले पाच महिने दररोज कोप्यांवर एकीकडे स्वयंपाकाचा धूर पसरायचा आणि दुसरीकडे ''अआई''चा आवाज घुमायचा. जिल्हा शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, विस्तार अधिकारी संजय जाधव यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कौतुक केले.
सुरवातीच्या स्तरनिश्चितीमध्ये २२० पैकी फक्त १३ मुलांना समजपूर्वक वाचता येत होते. पूर्वतयारीत ७३, मुळाक्षरात ४१, बाराखडीत १८ तर जोडाक्षरात ३७ मुले होती. हंगामाअखेर नव्वद टक्के मुलांची प्रगती झाली. पूर्वतयारीतून मुळाक्षरात ५४, मुळाक्षरातून बाराखडीत ४२, बाराखडीतून जोडाक्षरात १७, जोडाक्षरातून समजपूर्वक वाचनात २५ मुले गेली. हंगाम आटोपल्याने मुले मूळ गावाच्या शाळेत वार्षिक परीक्षा देऊ शकतील, अशी माहिती प्रकल्प समन्वयक संतोष शेंडकर यांनी दिली.

बालमेळावा, स्नेहसंमेलन
सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले, स्वतः अभ्यासवर्ग चालविणारा सोमेश्वर राज्यातील पहिला कारखाना आहे. अजून व्याप्ती वाढवायची आहे. मुलांचा दर शनिवारी बालमेळावा घेतला. प्रजासत्ताक दिन, बालिका दिन, शिवजयंती असे उपक्रम तसेच हस्तकला, चित्रकला, खेळ अशा स्पर्धा आणि भव्य स्नेहसंमेलन घेतले. मजुरांसाठी आरोग्य शिबिर, गर्भवती व स्तनदा मातांसाठी पोषण आहार, मुलांना लसीकरण हेही उपक्रम राबविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.