पुणे विद्यापीठात ‘अश्वगंधा’ संशोधन प्रकल्प
‘अश्वगंधा’ संशोधन प्रकल्प हा आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पांचा एक भाग आहे. पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली, हसन, बेळगाव, जयपूर या ठिकाणी हा प्रकल्प सुरू आहे.
पुणे - आयुर्वेदात विशेष महत्त्व असणाऱ्या ‘अश्वगंधा’ (Ashwagandha) या औषधी वनस्पतीची (Herbs) कोविड लसीकरणानंतरची (Covid Vaccination) उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या संशोधनात सामान्य नागरिकांना सहभागी होण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Pune University) उपलब्ध करून दिली आहे.
हा प्रकल्प आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पांचा एक भाग आहे. पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली, हसन, बेळगाव, जयपूर या ठिकाणी हा प्रकल्प सुरू आहे. ‘कोविड-१९’ प्रतिबंधासाठी लस घेतल्यानंतर अश्वगंधा वापरल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास किती मदत होऊ शकेल, त्याचे काय सकारात्मक परिणाम होतील, हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून संशोधन सुरू आहे. या प्रकल्पाची संकल्पना आयुष मंत्रालयातील राष्ट्रीय संशोधक डॉ. भूषण पटवर्धन यांची आहे. डॉ. अरविंद चोप्रा या अभ्यासाचे प्रमुख आहेत. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर, आरोग्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गिरीश टिल्लू तसेच संशोधक विद्यार्थी प्रकल्पासाठी काम करत आहेत.
संशोधन प्रकल्पाचे पुण्यातील केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असून, या केंद्रात लसीकरण झालेल्या १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांना अभ्यासात सहभागी करून घेण्यात येत आहे. या प्रकल्पात सहभागी नागरिकांना लस घेतल्यानंतर ‘अश्वगंधा’च्या गोळ्या देण्यात येतील. त्या गोळ्या घेतल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती लस घेणाऱ्यांच्या तुलनेत किती वाढली, याचा अभ्यास केला जाणार आहे. अश्वगंधा ही औषधी वनस्पती असून, अनेक आजारांवर उपयुक्त आहे, असे यापूर्वीच संशोधनातून समोर आले आहे. या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या नागरिकांची संपूर्ण काळजी घेण्यात येईल. तसेच त्यांच्यावर आर्थिक भार पडणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येत आहे. ‘‘१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनी लशीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर सात दिवसांत विद्यापीठातील आरोग्य केंद्रास भेट द्यायची आहे. तिथे त्यांना या संशोधनबाबतची संपूर्ण माहिती समजावून सांगितली जाईल. सहभागी होण्यास अनुमती दिलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल आणि त्यांना ‘अश्वगंधा’च्या गोळ्या दिल्या जातील. या गोळ्यांचे सेवन नियमितपणे करणे अपेक्षित आहे. ठरावीक काळानंतर पुन्हा तपासणी केली जाईल,’’ असे डॉ. टिल्लू यांनी सांगितले.
आयुर्वेदिक औषधींची उपयुक्तता पटवून देण्यासाठी आणि त्यांचा अधिक प्रचार, प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे देशपातळीवरील संशोधन प्रकल्प आयुष मंत्रालयाने हाती घेतले आहेत. ‘अश्वगंधा’बाबतचे शास्त्रशुद्ध संशोधन हा त्याचाच एक भाग आहे.
- डॉ. भूषण पटवर्धन, राष्ट्रीय संशोधक प्राध्यापक, आयुष मंत्रालय
विद्यापीठात केवळ चाकोरीबद्ध अभ्यासक्रम देण्याऐवजी समाजातील मूळप्रश्नांवर काम करण्याची संधी या निमित्ताने संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उपलब्ध करून देत आहोत.
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.