उशिरा उठणारे आळशी नसतात
त्यांची ‘स्वप्ने’ मोठी असतात!

उशिरा उठणारे आळशी नसतात त्यांची ‘स्वप्ने’ मोठी असतात!

Published on

गजर सुरू होण्याच्याआधीच बरोबर पहाटे पाचला उठलो. सगळं उरकून जॉगिंगची कपडे घालून साडेपाचला घराबाहेर पडलो. तळजाई टेकडीवर दहा किलोमीटर जॉगिंग केले. त्यानंतर मित्राची सायकल घेऊन, दहा किलोमीटर एकट्याने रपेट मारली. त्यानंतर जलतरण तलावामध्ये अर्धातास मनोसक्त पोहलो. बाहेर आल्यानंतर मन आणि शरीर एकदम पिसासारखं हलकं वाटत होतं.
एक जानेवारीपासून सुरू केलेला व्यायाम दोन महिन्यांनतरही सुरू असल्याने स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. कोपऱ्यातील आजोबांकडील वजनकाट्यावर ५६ किलो वजन भरलं. दोन महिन्यांत चक्क वीस किलो वजन कमी झालं होतं. स्वतःच्या डोळ्यांवर विश्‍वास बसेना. ढेर गायब झाल्याने बेढब शरीराला आकार आला होता. तेवढ्यात एका तरूणीने जवळ येत ‘‘काय रे कोठल्या कॉलेजमध्ये शिकतोस?’’ असं विचारल्याने माझ्या मनावर मोरपीस फिरवल्यासारखे झाले. तरुणाईकडून रोज ‘काका’ तर कधी कधी ‘आजोबा’ ही हाक ऐकायची सवय झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर ‘कोठल्या कॉलेजमध्ये शिकतोस?’ असं एका तरूणीनं विचारणं, याच्यासारखा आनंदी प्रश्‍न, दुनियेत नसेल, हा विचार मनात डोकावला. त्यानंतर स्वतःशीच ‘चल चल रे नवजवान’ हे ‘एक फूल, दो माली’ या चित्रपटातील गाणं म्हणत तळजाई टेकडीवरून घरी आलो. घरात आल्यानंतर बायकोची प्रसन्न मुद्रा नजरेस पडली. हलकंसं स्मित हास्य करीत ती म्हणाली, ‘‘आज नाश्‍त्यासाठी तुमच्या आवडीचं काय करू?’’ बायकोच्या मधाळ स्वरामुळे माझ्या मनावर एकदम तजेला आला. ‘फार दमला असाल तर पाय चेपून देऊ का?’ प्रेमानं ओथंबलेला तिचा प्रश्‍न ऐकून माझा थकवा एकदम पळून गेला. त्यानंतर एकमेकांना प्रेमाने भरवत आम्ही नाश्‍ता केला. गेल्या दोन महिन्यांपासून फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांचा रोज सरासरी पाच ते दहा मिनिटे वापर करतो. त्यामुळं दिवसातून किमान रोज दोन तास तरी अवांतर वाचन करतो. आठवड्यातून तीन दिवस स्वयंपाकाची सगळी जबाबदारी मी आनंदाने स्वीकारतो. त्यानंतर आॅफिस गाठतो. आजही सगळा स्वयंपाक मी केला. त्यानंतर बॅंकेतील किरकोळ कामासाठी घराबाहेर पडलो. मात्र, चौकातील सिग्नल चुकून तोडल्यामुळे हवालदारसाहेबांनी थांबवलं. ‘‘साहेब, काळजी घ्या. सिग्नल तोडणं चांगलं नाही,’’ असं अत्यंत मृदू आवाजात बोलून, त्यांनी गुलाबाचं फूल माझ्या हातात दिलं. ‘‘तुम्हाला आता उशीर होत असेल ना? तुम्ही जा पण परत सिग्नल तोडू नका, ही कळकळीची विनंती करतो.’’ असे म्हणून अत्यंत प्रेमभरानं त्यांनी मला नमस्कार केला. भारावलेल्या अवस्थेतच मी बॅंकेत आलो. तेथील सुरक्षारक्षकानं मला कडक सॅल्यूट ठोकला व अदबीने बॅंकेचे दार माझ्यासाठी उघडलं. तेवढ्यात एक कर्मचारी धावत माझ्याकडे आला. ‘‘साहेब, काय सेवा करू?’’ असं त्याने विचारलं. माझं काम सांगितल्यावर त्यांनी मॅनेजरच्या केबिनमध्ये नेलं. साहेब एकदम ओळखीचे हसले. पुढील पाच मिनिटांत माझं काम मार्गी लागलं होतं. ‘‘साहेब, चहा घेणार की कॉफी.’’ मॅनेजरने प्रेमानं विचारलं. मी आढेवेढे घेतले पण साहेबांनी फारच आग्रह केल्याने
‘एक कडक कॉफी.’ असं मी म्हटलं. त्यावेळी अंगावरील पांघरूण खसकन ओढत बायकोनं रणचंडिकेचा अवतार धारण केला होता.
‘‘दहा वाजले तरी हा बाबा अंथरूणात लोळतोय. एक जानेवारीला फक्त व्यायामाचं नाटक करतो. बाकी वर्षभर बकासुरासारखं खाऊन, ढाराढूर झोपतो. ढेर केवढी वाढलीय ते बघा. काडीचं काम करायची अक्कल नाही आणि झोपेतच मला ‘एक कडक कॉफीची’ ऑर्डर सोडतोय. मी मात्र एकटी संसारासाठी मरमर मरतेय. मी म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना तर कधीच घर सोडून पळून गेली असती.’’ बायकोचा तोंडाचा पट्टा सुरू झाल्यावर मी नेहमीप्रमाणे कानात कापसाचा बोळा घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.