Corona Vaccine
Corona Vaccine Google file photo

कोरोना : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

Published on

पुणे, ता. २५ : फेब्रुवारी संपला आणि मार्चमध्ये तर शाळाच संपते. त्यामुळे नवीन वर्षातच मुलांना शाळेत पाठवू, असा विचार पालकांनो तुम्ही करताय का? करत असाल तर तो चुकीचा विचार आहे. मुलांना लस नाही, म्हणून शाळा नाही, असे करू नका, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला.

कोरोना संसर्गाच्या भीतीने मुलांना शाळेत न पाठविण्याचा विचार करणाऱ्या पालकांचा एक मोठा गट दिसतो आहे. लसीकरण झाले नाही, त्यामुळे शाळेत पाठविता येत नाही, असा त्यामागचा एक विचार दिसतो. हे योग्य नाही. लसीकरण हे मुलांना शाळेत पाठविण्याचा निकष नाही, असेही बालरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले.
लसीकरणाचा संबंध मुलांना शाळेत पाठविण्याशी जोडू नका, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले. कोरोनाच्या तीनही लाटांमध्ये मुलांना हा आजार सौम्य राहिला आहे. त्यामुळे मुलांना ताप, सर्दी, खोकला झाला असला तरीही त्यातून मुलं गंभीर आजारी पडलेली नाहीत. घरातील सर्वांचे लसीकरण झाले आहे. तसेच, शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचेही लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुलांना सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लवकर लसीकरण चांगले
लहान मुलांचे लसीकरण जेवढे लवकर होईल, तेवढे चांगले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे मुलांना गंभीर आजार होण्याचे, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मुले दगावण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे जगभरात झालेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचा चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. मुलांचे लसीकरण करायला पाहिजे, हे निःसंशय आहे. लसीकरण महत्त्वाचे आहे, यावर देशभरातील बालरोगतज्ज्ञांचे एकमत आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने आता लस घेतली नाही, तरी चालेल अशी एक भावना निर्माण होत आहे. पण, हा मोठा गैरसमज आहे. कारण, ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची तिसरी लाट आटोक्यात येत असली तरीही नजीकच्या भविष्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट येणारच नाही, असे खात्रीशीर कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आत्ता केलेले कोरोना प्रतिबंध लसीकरण भविष्यातही लहान मुलांना उपयुक्त ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या ‘पेडियाट्रिक टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले.

प्राधान्याने कोणाला लस?
अति-जोखीम असलेल्या मुलांचे लसीकरण हे केलेच पाहिजे. लठ्ठ मुले, मधुमेही, तीव्र स्वरुपाचा आटोक्यात न येणारा दमा, स्टिरॉईडस् सुरू असलेली तसेच, कोणत्याही कारणांनी रोग प्रतिकारक शक्ती खालावलेली मुले यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस दिली पाहिजे. या मुलांना कोरोना झाल्यानंतर उपचारात गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असल्याने अशा मुलांना शाळेत पाठविण्याबाबत बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन डॉ. जोग यांनी केले.

दवाखान्यात येणाऱ्या पालकांनी त्यांच्या १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस दिली की नाही हे डॉक्टरांनी स्वतःहून विचारावे आणि दिली नसेल तर देण्यास उद्युक्त करावे, त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. जोग यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()