‘टीम सहकारनगर’ चे आत्मनिर्भरतेकडे पाऊल

‘टीम सहकारनगर’ चे आत्मनिर्भरतेकडे पाऊल

चोरी, घरफोड्या रोखण्यास मदत; सुरक्षितता, स्वच्छता, पर्यावरण क्षेत्रातही काम
Published on

पुणे : अवतीभोवतीच्या घरांमध्ये चोरी, घरफोडीच्या घटना घडत होत्या, त्याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत होता. त्यामुळे त्यांच्यात भितीचे वातावरणही होते. त्याची ‘त्या’ सगळ्यांनी दखल घेतली, ते एकत्र आले. बघता-बघता त्यांच्या टीमने पोलिसांच्या मदतीने अशा घटना रोखण्यासाठी रात्रगस्त घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे चोरीच्या घटना कमी झाल्याच, शिवाय ज्येष्ठांनाही सुरक्षिततेची हमी मिळाली. अशा एकाच विषयापुरते नाही, तर सुरक्षितता, स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य अशा अनेक विषयात त्यांनी काम केले आणि ते स्थानिक रहिवाशांच्या कौतुकाचे वाटेकरी ठरले, ते म्हणजे ‘आत्मनिर्भर सहकारनगर’.

सहकारनगर २ येथे बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांची मुले-मुली परराज्यात आणि परदेशात आहेत, त्यामुळे त्यांना कोणाचा आधार नव्हता आणि त्यात शहराच्या इतर भागांप्रमाणेच याही परिसरात चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले होते. त्यातच कोरोनाकाळामध्ये याच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदतीचीही गरज भासू लागली. त्यांना आधाराची गरज होती. ज्येष्ठ नागरिकांसह अन्य लोकांचे होणारे हाल, त्यांना येणाऱ्या अशा अनेक समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन स्थानिक नागरिकांचा एक गट २०२० मध्ये पुढे आला. या गटाने अशा समस्यांवर केवळ आवाजच उठवला नाही, तर त्या सोडविण्यासाठी स्वतः प्रयत्न करण्यास प्राधान्य दिले. विशेषतः या गटामध्ये डॉक्‍टर, शिक्षक, प्राध्यापक, वकील, निवृत्त पोलिस, चार्टड अकाउंटंट, अभियंते, संगणक अभियंत्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्यांचा सहभाग आहे. पुणे महापालिकेचे काही कर्मचारीसुद्धा या टीमला सहकार्य करत आहे.

‘‘आत्मनिर्भर सहकारनगर’ या नावाने सुरू झालेल्या या गटाच्या उपक्रमामध्ये प्रारंभी सातत्याने होणाऱ्या घरफोडी, चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्राधान्य देण्यात आले. यामुळे अनुचित घटना कमी होण्यास मदत झाली. गटाने केलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुढे त्यांनी कोरोनाकाळात ज्येष्ठ नागरिकांना आवश्‍यक सर्व मदत, लसीकरणासाठी सहकार्य, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण असे अनेक वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. काही काळातच या गटाचे सदस्यांची संख्या सुमारे ४ ते ५ हजारांपर्यंत गेली. व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून सर्व सदस्य एकमेकांच्या संपर्कात आहे. कोरोनानंतरही या गटाचे काम सुरू आहे, त्याचा स्थानिक नागरीकांना उपयोग होत आहे.’’
- अमित शहाणे, सदस्य, टीम सहकारनगर

‘‘टीम सहकारनगरची स्थापना झाल्यामुळे अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या उपक्रमात सर्वच वयोगटाच्या नागरिकांचा सहभाग आहे. एकमेकांना सहकार्य करणे, सहकारनगरमध्ये स्वच्छता, शांती राखून ठेवणे हा या उपक्रम राबविण्यामागचा उद्देश आहे. असे उपक्रम प्रत्येक छोट्या मोठ्या परिसरात राबविल्यास आणि प्रत्येक ठिकाण आत्मनिर्भर झाल्यास देशाची प्रगती होण्यासाठी मोठी मदत होईल.’’
- श्रीकृष्ण जोशी, सदस्य, टीम सहकारनगर

...अशी आहेत टीमची कामे
- निराधार ज्येष्ठ नागरिकांना घरपोच जेवण
- अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे काम
- तळजाई टेकडीवर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान
- दोनशेपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
- फोटोग्राफी वर्कशॉप
- परिसरात सीसीटिव्ही बसविले
- भटक्या कुत्र्यांची समस्येवर तोडगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()