जंगलांचा गुदमरतोय श्‍वास!

जंगलांचा गुदमरतोय श्‍वास!

Published on

पुणे, ता. ९ ः उन्हाळ्याच्या हंगामात वणव्यांचे प्रमाण वाढले असून गेल्या तीन महिन्यांत पुणे वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डोंगर आणि टेकड्यांवर ४५ वणव्यांची घटना घडली आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही बाब समोर आली आहे. एकीकडे वणव्यांच्या घटना वाढत असून वणवे वेळेत विझविण्यात यावे यासाठी पुणे वन विभागाद्वारे स्वयंसेवी संस्था, महसूल विभाग तसेच महानगरपालिकेच्या साहाय्याने वणवा प्रतिबंधक परिषदेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, अद्याप ही परिषद झालेली नाही. परिणामी वणव्यांच्या वाढत्या घटनांमुळे वनसंपदेचे नुकसान होत आहे.

अशी आहे स्थिती
- जानेवारी ते मार्च या कालावधीत वणव्याच्या घटना
- पुणे, भांबुर्डा, पौड, बारामती, इंदापूर, दौंड, शिरोटा आणि वडगाव मावळ या भागात घटना
- सर्वाधिक घटना मार्च महिन्यात
- सुमारे ६५ हेक्टर क्षेत्र जळाले
- सध्या वेताळ टेकडी, तळजाई टेकडी कात्रज, कोंढवा परिसरातील टेकड्यांवर वणव्यांच्या घटना घडतात
- मानव निर्मित वणव्यांच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक
- गेल्या वर्षी वणवा प्रतिबंधक परिषद घेण्यात येणार होती
- कोरोनाच्‍या वाढत्‍या रुग्णसंख्या पाहता लॉकडाउनमुळे परिषद लांबणीवर
- या वर्षी ही परिषद होईल असे सांगण्यात आले होते
- मार्च उलटून गेला असून अद्याप परिषद झालेली नाही

पुणे शहर व परिसरातील वणव्यांना वेळेत विझविण्यात यावे यासाठी वणवा प्रतिबंधक परिषद आयोजित करण्याचे नियोजन केले होते. यामध्ये महापालिका, स्वयंसेवी संस्था आदींचा सहभाग असेल. ही परिषद कोणत्याही नियमाचा भाग नसून आमच्या स्तरावर विविध विभाग, संस्थांना एकत्रित करत वणव्यांना टाळणे व त्याचे नुकसान कमी करण्यासाठी केला जाणारा एक प्रयत्नाचा भाग म्हणून वणवा प्रतिबंधक परिषद घेतली जाणार होती. काही कारणांमुळे मार्च महिन्यात ही परिषद घेता आली नाही परंतु, येत्या आठवड्यात ही परिषद घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक

हद्दीचा प्रश्‍न कायम
पुणे शहर व जिल्ह्यातील विविध डोंगर आणि टेकड्‍यांवर वणवे लागतात. परंतु हे क्षेत्रफळ केवळ पुणे वन विभागाच्या अंतर्गत येत नसून यातील काही डोंगर खासगी मालकीच्या तर काही टेकड्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात. अशात वणवा लागल्यावर तो विझविण्यासाठी नागरिकांना कोणाच्या हद्दीत वणवा लागला आहे आणि यासंदर्भात कोणत्या विभागाला संपर्क करावा हा प्रश्‍न निर्माण होत आहे. तर महापालिका प्रशासन आणि वन विभागात हद्दीचा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगल जळालेली पाहायला मिळत आहेत. नागरिकांकडून वणव्या संदर्भात माहिती मिळाली तर हद्दीचा विचार न करता ते विझविण्याचा प्रयत्‍न केला जातो, असे वन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वणव्यांची स्थिती
महिना ः वणव्यांची संख्या ः जळीत क्षेत्र (हेक्टर मध्ये)
जानेवारी ः ३ ः १०.१५
फेब्रुवारी ः १२ ः १९.३०
मार्च ः ३० ः ३६.०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.