जयपूरकडून पुण्याचा पराभव

जयपूरकडून पुण्याचा पराभव

Published on

नोईडा, ता. १७ : डावा कोपरारक्षक अंकुश राठीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर जयपूर पिंक पॅंथर्सने रविवारी प्रो कबड्डी लीगमधील सामन्यात पुणेरी पलटणला ३०-२८ असे पराभूत केले.
पूर्वार्धात वेगवान सुरुवात करणाऱ्या जयपूरने तोच जोश कायम ठेवून पुणे संघावर दबाव राखणे अपेक्षित होते. सहा मिनिटांतच लोण बसल्यावर पुणेरी संघाकडून सामना संथ करण्याची अपेक्षा होती. मात्र, जयपूरने मोठी आघाडी लक्षात घेत सामना संथ केला. त्यात नंतर दोन्ही संघांनी तिसऱ्या चढाईत खेळण्याचे नियोजन केले. त्यामुळे सामना अधिकच संथ झाला. तिसऱ्या चढाईच्या चक्रात पुणे संघाचे चढाईपटू अडकले. याचा फायदा घेत जयपूरची आघाडी कायम होती. मात्र, आकाश शिंदेच्या एका अव्वल चढाईने सामन्यातील रंगत वाढली होती. पण, निर्णायक क्षणी अर्जुन देशवालने मिळविलेले बोनस गुण आणि अखेरच्या सेकंदाला अंकुश राठीने केलेली पकड जयपूरसाठी निर्णायक ठरली. अंकुशने हाय फाइव्ह करताना सहा गुण कमावले. अर्जुनने ८ गुणांची कमाई केली. पुणेरी संघाकडून आकाश शिंदेचे ७ गुण वगळता अन्य चढाईपटू अपयशी ठरले. गौरव खत्री आणि अमन यांनी बचावात प्रत्येकी तीन गुणांची कमाई केली.
उत्तरार्धात सामन्याचे चित्र फारसे वेगळे दिसत नव्हते. जयपूर संघाने सात ते आठ गुणांची आघाडी कायम राखली होती. मात्र, सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला २३-१६ अशा पिछाडीवर असलेल्या पुणे संघाला आकाश शिंदेच्या अव्वल चढाईने सामन्यात परतण्याची संधी दिली. या चढाईने गुणफलक २३-१९ असा झाला आणि त्यानंतर लोण चढवत पुणे संघाने सामना २४-२२ अशा निर्णायक वळणावर आणला. या क्षणापासून अखेरपर्यंत सामना दोन गुणांच्याच फरकाने जयपूरच्या बाजूने होता. मात्र, अखेरच्या १ मिनिटांत सामन्याचे चित्र २९-२८ असे दिसत होते. सेकंद सेकंदाच्या लढाईत पुणे संघाने अखेरची चढाई मिळवली. मात्र, सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अंकुश राठीने आकाशची पकड करून निसटत चाललेल्या सामन्यात जयपूरला ३०-२८ असा विजय मिळवून दिला.

पंकज, आकाश, मोहितचे अपयश
पूर्वार्धाच्या खेळात पुणेरी संघाच्या खेळाडूंना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आला नाही. त्यांचे चढाईपटूंना यश मिळाले नाही. शिवाय त्यांच्या बचावपटूंनाही अपयशाचा सामना करावा लागला. सर्वाधिक चढाई गुणांच्या शर्यतीत असलेल्या अर्जुन देशवालच्या सुरुवातीच्या चढायांमुळे जयपूरने सहाव्याच मिनिटाला लोण चढवत ११-५ अशी मोठी आघाडी मिळवली आणि ती मध्यंतरापर्यंत कायम राखली. पुणेरी संघाच्या पंकज मोहिते, आकाश शिंदे आणि मोहित गोयत या चढाईपटूंचे पूर्वार्धातील अपयश निश्चित चिंतेचे ठरले. या सत्रात त्यांना चढाईचे केवळ ४ गुण मिळवता आले. जयपूरने बचावातही चमक दाखवताना मध्यंतराला १९-१२ अशा आघाडीसह सामन्यावर नियंत्रण कायम राखले होते.

हरियानाच्या विजयात विनय चमकला
हरियाना स्टीलर्स संघाने रविवारी पार पडलेल्या अन्य सामन्यात तमीळ थलैवाज संघावर ३६-२९ असा विजय मिळवला. विनयने दहा गुणांची कमाई केली. शिवम पाटारेने सहा गुणांची आणि एम. शादलोईने आठ गुणांची कमाई केली. या तीन खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर हरियानाने विजय साकारला. तमीळ संघाकडून मोईन शफागीने एकाकी झुंज दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.