गणेशोत्सव स्पर्धेत श्रीकृष्ण मंडळ प्रथम
पुणे, ता. २३ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या २०२२च्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत महापालिका क्षेत्र विभागांत लष्कर परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या मंडळाला रोख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
या स्पर्धेत नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने द्वितीय, बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टने चतुर्थ तर, भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बुधवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त विजयकुमार वांबुरे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘या स्पर्धेत सहभागी झालेल्या १५२ मंडळांपैकी १०४ मंडळांनी पारितोषिके मिळविली आहेत. विजेत्या सर्व मंडळांना मिळून एकूण १४ लाख ३१ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत पहिल्या आलेल्या श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या बिरसा मुंडा क्रांतिकारक सजीव देखाव्याला ५१ हजार रुपयांचे तर, संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या शालेय साहित्यापासून गणेश मूर्तीची स्थापना, या देखाव्यास ४५ हजारांचे, महाराष्ट्र तरुण मंडळाच्या माणुसकी हाच धर्म, या सजीव देखाव्यास ४० हजारांचे, नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टच्या पावनखिंड लढा, या सजीव देखाव्याला ३५ हजारांचे आणि शिवाजी मित्र मंडळाच्या काकोरी कांड, या देखाव्याला ३० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.’’
या स्पर्धेचे परीक्षण मकरंद रानडे, डॉ. अ. ल. देशमुख, पराग ठाकूर, विजय चव्हाण, सुरेश वरगंटीवार, मधुकर जिनगरे, सतीश मराठे, किशोर सरपोतदार, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर आदींनी केले.
दरम्यान, या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या रविवारी (ता. २७ ऑगस्ट) आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ रविवारी सायंकाळी सहा वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. या समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पारितोषिके दिली जाणार आहेत.
‘साखळीपीर’ला जय गणेश भूषण पुरस्कार
या स्पर्धेअंतर्गत दिला जाणारा जय गणेश भूषण पुरस्कार नाना पेठेतील साखळपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंडळाला जाहीर करण्यात आला आहे. या मंडळाला रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.