MPSC ANDOLAN PUNE
MPSC ANDOLAN PUNEESAKAL

MPSC Andolan: मध्यरात्री पुण्यात चार-पाच हजार विद्यार्थी उतरले रस्त्यावर, काय आहे ‘एमपीएससी’ च्या विद्यार्थ्यांचे नवे आंदोलन ?

Civil Services Student Protest in Pune : रविवारी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करावा, तसेच एमपीएससी आणि ‘आयबीपीएस’ या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी हजारो विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.
Published on

पुणे, ता. २० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४’ रविवारी (ता. २५) होत आहे. याच परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करावा, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जवळपास चार-पाच हजार विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर उतरून मंगळवारी रात्री उशिरा आंदोलन सुरू केले.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आयोजनाची पूर्वतयारी झाली आहे. या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नाही, असे लोकसेवा आयोगाने मंगळवारी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. रविवारी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करावा, तसेच एमपीएससी आणि ‘आयबीपीएस’ या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी हजारो विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आयोगाने हात वर केल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनास सुरुवात केली.

सुरुवातीला शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. मात्र, रात्री अकराच्या सुमारास जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने तणावपूर्ण वातावरण झाले होते. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आंदोलन मागे घेण्यास सांगितले. परंतु, विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची संख्या पाहून पोलिसांच्या चार - पाच गाड्या दाखल झाल्या. पोलिसांनी शांततेत आंदोलन करण्याची सूचना केली कुणीही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

कृषी विभागातील राजपत्रित अधिकारी गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मधील मंजूर पदांची जाहिरात प्रसिद्ध करून या पदांचा समावेश २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ या परीक्षेत करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थींनी केली. तसेच याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. आता, यावर राज्य सरकार आणि लोकसेवा आयोग काय भूमिका घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...