crime
crimesakal

Crime News : आता ‘व्हाइट कॉलर’ खंडणीखोर!

व्यावसायिकांकडून चार टक्के दराने वसुली : ‘मॅनेजमेंट चार्जेस’च्या नावाखाली बेकायदा करार
Published on

पुणे : ‘‘तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तर आम्हाला तुमच्या ‘इनव्हॉइस’वरील रकमेवर दर महिन्याला चार टक्के ‘मॅनेजमेंट चार्जेस’ द्यावे लागतील. राजकीय व्यक्ती, पोलिसांना आम्ही घाबरत नाही, त्यांच्याकडे गेलात तर तुमचा बिझनेस बंद म्हणजे बंदच...’’

हे शब्द आहेत, खराडी आयटी पार्कमधील एका व्यावसायिकास मिळालेल्या धमकीचे! खराडी येथील आयटी कंपन्यांच्या सेवा पुरवठादारांकडून मॅनेजमेंट चार्जेसच्या नावाखाली स्थानिक व्हाइट कॉलर’ गुंडांकडून चार टक्के दराने खंडणी वसूल करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु आहे.

त्यांना विरोध करणाऱ्यांना गुंडांकडून संपविण्याची भाषा वापरली जाते, एवढेच नव्हे तर संबंधित गुंड सेवा पुरवठादारांशी बेकायदा करारपत्र करत असल्याचे भयावह वास्तव आहे. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये सध्या नाराजी व संतापाची लाट निर्माण होऊ लागली आहे.

खराडी येथील ‘युवॉन आयटी पार्क’, वाघोली, येरवडा, लोहगाव, वडगाव शेरी या परिसरामध्ये आयटी कंपन्यांसह विविध प्रकारचे उद्योग, व्यवसाय स्थिरावू लागले आहेत. त्यादृष्टीने संबंधित उद्योग, व्यवसायांना कॅन्टीन, कर्मचारी ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, स्क्रॅप, हाऊसकिपींग, सुरक्षा रक्षक, बांधकाम, फर्निचर मटेरिअल अशा विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरविण्याची कामे स्थानिक व बाहेरील व्यावसायिकांकडून केली जात आहे.

त्याद्वारे हजारो बेरोजगारांच्या हातांना मोठ्या प्रमाणात रोजगारही प्राप्त होऊ लागला आहे. एका व्यावसायिकाकडे किमान ५०० ते एक हजार कामगार अवलंबून आहेत. दरम्यान, त्यांच्याकडून कंपन्यांना चांगल्या पद्धतीने सेवा पुरविली जात असतानाच, आता संबंधित सेवा पुरवठादारांना स्थानिक ‘व्हाइट कॉलर’ गुंडांकडून खंडणीसाठी अक्षरशः धमकाविले जाते.

अशी आहे कार्यपद्धती
- स्थानिक गुंड किंवा त्यांचे साथीदार कंपन्यांच्या आवारात जाऊन व्यावसायिकांची माहिती काढतात
- त्यानंतर त्यांना बोलावून त्यांच्याकडे कंपनीकडून त्यांना मिळणाऱ्या रकमेच्या कागदपत्रावरील (इनव्हॉइस) रक्कम पाहून, त्यावर चार टक्के दराने दरमहा खंडणीची मागणी करतात
- त्यांना वाहने फोडण्याची, कामगारांना मारहाण करण्याची व कंपन्यांना सांगून थेट व्यवसायच बंद पाडण्याची धमकी दिली जाते
- त्याहीपुढे जाऊन सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना धमकावीत त्यांच्याशी परवानगी नसतानाही बेकायदा करारपत्र केले जाते
- संबंधित व्यावसायिकही आपल्या व्यवसायाला फटका बसू नये, कामगारांना मारहाण, वाहनांची तोडफोड होऊ नये, यासाठी घाबरून करार करतात

आम्ही आयटी कंपनीला आवश्‍यक सेवा पुरवितो. काही व्यक्ती स्थानिक असल्याचे सांगून आमच्याकडे दरमहा चार टक्के दराने सर्रासपणे खंडणी मागत आहेत. बेकायदा करार करीत आहेत. त्यांना विरोध केल्यास मोठे आर्थिक नुकसान करण्याची धमकी देत आहेत. ते पोलिसांना घाबरत नाहीत. हे चित्र कायम राहिल्यास त्याचा उद्योग, व्यवसायाला फटका बसेल.
- व्यावसायिक

खंडणी वसुली करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. मागील वर्षी ही खंडणीखोरांवर कारवाई करून अशा प्रकारांवर आळा घातला आहे. व्यापारी, छोटे व्यावसायिक, दुकानदार आणि नागरिकांना अशाप्रकारे कोणी त्रास देऊन खंडणी मागत असल्यास निर्भयपणे खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा येथे तक्रार करावी. त्याची योग्य दखल घेऊन पुढील कारवाई केली जाईल.
- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे)

उद्योग परराज्यात जात असतानाही...
एकीकडे महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग, कंपन्या परराज्यात जात असतानाही उद्योग, व्यावसायिकांच्या सुरक्षिततेबाबत पुण्यासह महाराष्ट्रातील स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. खराडी, वाघोली येथील आयटी कंपन्यांना सेवा पुरविणाऱ्यांना व्यावसायिकांना खंडणीसाठी त्रास दिला जात आहे.

त्याबाबत तक्रार केल्यास थेट त्यांचे व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली जात असल्याने व्यावसायिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र हा त्रास असाच सुरू राहिला, तर व्यावसायिकांसह आयटी कंपन्या देखील त्याची गांभीर्याने दखल घेऊन वेगळा निर्णय घेऊ शकतात, असे व्यावसायिकांनी सांगितले.

व्यावसायिकांच्या अडचणी
- कंपन्यांकडून व्यावसायिकाचे काम बंद होण्याची भीती
- कामगारांना दमदाटी, मारहाण करण्याची शक्‍यता
- मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू शकतो
- राजकीय व्यक्ती, स्थानिक नेत्यांचाही हस्तक्षेप करण्यास नकार
- स्थानिकांसह परप्रांतीय नागरीकांना सर्वाधिक फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()