Childrens Fear : ‘आई, मला भीती वाटतेय...!’
विद्येच्या प्रांगणात छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांवर मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडूनच अत्याचार, लैंगिक शोषणाचे प्रकार घडत असतील. खरं तर परिकथेत रमण्याच्या वयात बालकांवर अत्याचार होत असतील, तर! आता ही बालकं पालकांना, ‘आई, मला भीती वाटतीय’ असे म्हणू लागली आहेत.
अशा वेळी पालकांनीही डोळे उघडण्याची गरज आहे. ‘आपल्या मुलांकडून असे कोणाचे शोषण होत नाही ना!, ते कोणावर अत्याचार करत नाहीत ना!’ हे पालकांनी जाणीवपूर्वक पाहायला हवे, असा सल्ला बालमानसशास्त्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
आपली मुलगी किंवा मुलगा किशोरवयीन अवस्थेत असेल, तर आता पालकांनीच वयात येणाऱ्या आपल्या मुलांच्या भावविश्वात डोकवायची गरज आहे. आपला मुलगा/मुलगी काय करत आहेत, त्यांच्या मनात कोणता (मानसिक किंवा शारीरिक) आकर्षणाचा गुंता होत नाहीये ना, हे आपण ओळखायला हवे. अन्यथा किशोरवयात ‘तो’ किंवा ‘ती’ लैंगिक शोषण करणे, छोटे-मोठे गुन्हे करणे अशा घातक आणि अत्यंत धोकादायक वळणाकडे झुकले जातील. म्हणूनच आता पालकांनो जागे व्हा...! आणि आतातरी मुलांच्या अंतरंगात डोकवा, हे सांगण्याची वेळ आली आहे.
लहान, निरागस असणाऱ्या पाच-सहा वर्षांच्या बालकांचे जेव्हा लैंगिक शोषण होते आणि शोषण करणारेही अल्पवयीन असतात, तेव्हा मन सुन्न होते. अशा प्रसंगात शोषण करणारी अल्पवयीन म्हणजे साधारणत: कळत्या वयातील, वयात आलेली किशोरवयीन मुलं असतील, तर अशा घटनांना नेमके जबाबदार कोण, हा प्रश्न विचारला जातो. या पार्श्वभूमीवर बालमानसशास्त्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, समुपदेशकांशी चर्चा करून केलेला ऊहापोह.
मोकळा संवाद आवश्यक
बालमानसशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, ‘‘सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आपण काहीतरी वेगळं करूयात, आपण हे करून पाहूयात, अशा प्रकारे मुलांकडून गुन्हे घडत आहेत. वयात येताना शारीरिक आकर्षण आणि त्या अनुषंगाने इंटरनेटवर काहीतरी (चुकीची) माहिती पाहून, त्या पद्धतीने गोष्टी करायचा, अशी विकृत मानसिकता मुलांमध्ये विकसित होत आहे.
हे टाळण्यासाठी पालकांनी वयात येणाऱ्या मुलांशी मोकळा संवाद साधायला हवा. त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा. त्यातून मुलांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे समजेल. आवश्यकता वाटल्यास मुलांना योग्य काय, अयोग्य काय हे सांगावे. याशिवाय मुलांसमोर चांगले आदर्श निर्माण करायला हवेत. मुलांना त्यांच्या योग्य वयात लैंगिक शिक्षण देऊन प्रबोधन करण्याची गरज आहे.’’
पालकांचे दुर्लक्ष अन् चुकीचे वागणे
‘‘आपली मुले काय करत आहेत, कोठे जात आहेत, याकडे पालक अजिबात लक्ष देत नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांकडून होणाऱ्या चुकीच्या गोष्टींबाबत पालक अनभिज्ञ असतात,’’ असे रोखठोक वक्तव्य समुपदेशक स्मिता कुलकर्णी यांनी केले. त्या म्हणतात, ‘‘पूर्वीच्या काळी पालकांचे एकमेकांमधील संबंध हे अत्यंत नियंत्रित आणि गोपनीय असायचे. परंतु, आता त्यात मोकळेपणा आला आहे. त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो.
याशिवाय मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे इंटरनेटवरून मुले चुकीची माहिती मिळवीत आहेत. इंटरनेटवरील गोष्टी करून पाहणे, दुसऱ्यांना चिडविण्यासाठी काहीतरी कृत्य करणे, याचे प्रमाण वाढत आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई-बाबा दोघेही नोकरी करत असतात. त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला दोघांनाही पुरेसा वेळ नसतो. मुलांकडे केलेले दुर्लक्ष हे आपल्या मुलांना धोक्याच्या वळणाकडे घेऊन जात नाही ना, हे पालकांनी जाणीवपूर्वक पाहणे आवश्यक आहे.’’
पालकांची जबाबदारी...
- किशोरवयातील मुलांशी मोकळा संवाद साधावा
- मुलांचे नेमकं काय सुरू, हे जाणून घ्यावे
- मुलांच्या मैत्रीतील गप्पा, चर्चांकडे लक्ष द्यावे
- वयात येताना वाटणारे आकर्षण, लैंगिक शिक्षणाबाबत मार्गदर्शन करावे
- गरज वाटल्यास समुपदेशकांची, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी
- चांगल्या गोष्टींचे आदर्श मुलांसमोर ठेवावे
- मुलांचे गैरसमज वेळोवेळी दूर करावेत
- कुटुंबांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊ दिल्यास त्यातून मुलांचे भावविश्व कळेल
शाळांची जबाबदारी...
- आवारात अद्ययावत सीसीटीव्ही आवश्यक
- शाळेत समुपदेशक अनिवार्य
- किशोरवयीन मुलांमध्ये होणाऱ्या मानसिक, शारीरिक बदलांच्या अनुषंगाने उपयुक्त कार्यशाळांचे आयोजन करावे
- लैंगिक शिक्षणाविषयी योग्यप्रकारे प्रबोधनाची करण्याची गरज
शिक्षकांची जबाबदारी...
- वर्गातील विद्यार्थ्यांच्या हालचालींवर अप्रत्यक्षरीत्या लक्ष द्यावे
- मुलांमध्ये विविध विषयांवर गट चर्चा घडवून आणाव्यात
- चर्चांमधून मुलांच्या मनात सुरू असलेल्या गोष्टींचा कानोसा घ्यावा
- विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार होत असल्यास वेळीच निदर्शनास आणून द्यावे
- शिक्षक आणि पालक बैठकांमध्ये मोकळा संवाद आवश्यक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.