पाणीपुरवठ्याबाबत गतीने पावले उचला

पाणीपुरवठ्याबाबत गतीने पावले उचला

Published on

पुणे, ता. १७ : महापालिकेतील समाविष्ट गावांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना टॅंकरवर दरमहा लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. त्याचा फायदा टॅंकरमाफिया नेत्यांकडून उचलला जात आहे. याबाबत ‘सकाळ’ने ‘टॅंकरमाफिया नेत्यांना ‘पाणी पाजा’ असे वृत्त प्रकाशित केले होते. यावर नागरिकांनी प्रतिक्रिया कळविल्या आहेत.

उंड्रीत घर घेऊन घोडचूक केली, याची खात्री पटली आहे आता. कारण सहा वर्षे झाली अजून महापालिकेतर्फे पाणी नाही, रस्ते नाहीत. आमच्या अडीचशे फ्लॅटच्या सोसायटीत दररोज पाण्याचे १६ टँकर लागतात. त्यामुळे दरमहा तीन हजार रुपये मेंटेनन्स भरावा लागतो. त्यातील निम्म्याहून अधिक रक्कम पाण्यावरच खर्च होते. नळाने कधी पाणीपुरवठा होणार देव जाणे. ‘हर घर जल योजना’ राबविणाऱ्यांना सांगा येथे पाणी नाही लोकांना. त्यात महापालिकेने या वर्षी १५ हजार २७२ रुपये मिळकत कर आकारला आहे. तरीही ना पाणी, ना रस्ते, ना ड्रेनेजची व्यवस्था. त्यापेक्षा भाड्याने राहिलेले बरे. कसली स्मार्ट सिटी आणि कसलं काय. टँकरमाफिया नेते आणि लाचखोर अधिकारी यांच्या संगनमताने हे सर्व सुरू आहे.
- दिगंबर जमनिक, उंड्री

‘सकाळ’ने वास्तव स्थिती मांडली आहे. पाणीपुरवठा करण्याबाबत उपाययोजना कोण करणार, कधी करणार? याचा काहीच थांगपत्ता नाही. गृहनिर्माण सोसायटीमधील सभासदांना मेंटेनन्स दिला की पाणी हवे असते. सोसायटीलाही काटकसर करून सोसायटी चालवायची असते. याचा सारासार विचार करता महापालिकेने पाणीपुरवठा करण्यासाठी गतीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे. पण इथे सगळे आलबेल आहे. समाविष्ट गावांमधील नागरिकांची ‘ना घर ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे.
- प्रशांत शिंदे, पिसोळी

महापालिकाच नव्हे तर केवळ पोकळ आश्वासने देणाऱ्या नेत्यांचेही हे संयुक्त अपयश म्हणावे लागेल. यात चांदी झाली ती टॅंकरमालक आणि त्यांना मनोभावे मदत करणाऱ्यांची. सामान्य नागरिक भरडला जात आहे. नागरिकांना सुविधाच मिळत नसतील, तर मिळकत कर का भरावा? नागरिकांनी आता निवडणुका समोर ठेवून आश्वासने देणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे.
- राजेंद्र चुत्तर, पुणे

टँकरमाफियांना आपसूकच धंदा देण्यास बिल्डर, ग्रामपंचायत आणि महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. लोकांनीही घर घेताना पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था आहे का, हे बघितले पाहिजे. या सर्व सुविधा देत नसतील तर नागरिकांना कर आकारणी का केली जाते, हेच समजत नाही.
- उमेश परदेशी, शनिवार पेठ

आमच्या व्यथा मांडणारे एकमेव वृत्तपत्र म्हणजे ‘सकाळ’. गेले अनेक दिवस आम्ही पाणीटंचाईचा सामना करत आहोत. आमची पाचमजली इमारत असून, ४८ सदनिका आहेत. आम्हाला पद्मावती येथून आठवड्यातून एक पाणी टँकर येतो. इतके पाणी कसे पुरणार? आमच्या सोसायटीत गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात. आम्हाला दररोज एक टॅंकरने पाणीपुरवठा करावा.
- महेश साळुंके, वरद वृंदावन सोसायटी, निंबाळकर गुजरवाडी, कात्रज

कोंढवा बुद्रुक येथील शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील सोसायटी आणि नाना-नानी पार्कसमोर महापालिकेच्या मालकीचा मुख्य रस्ता आणि पदपथ फोडून मुख्य पाइपलाइनमधून अनधिकृत पाणी घेतले जात आहे. संबंधित अधिकारी आणि पाणीचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी.
- एक पुणेकर

महापालिकेत नव्याने गावे समाविष्ट करणे, हा राजकीय स्टंट झाला. सध्याचा कारभार सांभाळण्यास महापालिका सक्षम आहे का? हे तरी पाहायला हवे होते. अतिरिक्त भार देऊन आहे, ती घडीसुद्धा बिघडवली आहे.
- प्रशांत उमरदंड, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.