ITI
ITIsakal

ITI : येरवड्यात होणार नवीन ‘आयटीआय’; राज्य सरकारने मान्यता दिली

येरवड्यात उभारण्यात येणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) १८ व्यवसाय अभ्यासक्रम तुकड्या आणि ४० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य सरकारने दिली मान्यता.
Published on

पुणे - येरवड्यात उभारण्यात येणाऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) १८ व्यवसाय अभ्यासक्रम तुकड्या आणि ४० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसेच या आयटीआयमध्ये नऊ व्यावसायिक अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून प्रवेश क्षमता ३७६ इतकी असणार आहे. त्यामुळे आता लवकरच पुण्यातील नव्या शासकीय आयटीआयच्या उभारणीला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

पुणे जिल्ह्यात येरवडा आणि नगर रस्ता क्षेत्र, रांजणगाव, चाकण येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आहे. याठिकाणी आशिया खंडातील नामांकित उद्योग कार्यरत आहेत. शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यामानाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील उपलब्ध प्रवेश क्षमता लक्षात घेता प्रवेशोच्छुक उमेदवारांना प्रवेश मिळत नाहीत.

ITI
Motivation Story : अवघ्या अकरा वर्षांचा अर्हम झाला ‘शेफ’!

त्यामुळे येरवड्यात नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी १६ डिसेंबर २००८ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तर सेंटर ऑफ एक्सलन्स बेसिक मॉड्युलच्या संलग्न तुकड्यांचे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत २०१४-१५ पासून व्यवसाय अभ्यासक्रमात रूपांतर करण्यास जुलै २०१४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर आयटीआयच्या उभारणीचे काम रखडले होते. आता ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासाठी १८ व्यवसाय तुकड्या आणि त्यासाठी आवश्यक २३ शिक्षकीय, ८ शिक्षकेतर आणि ९ चतुर्थश्रेणी/पहारेकरी/सफाईगार अशा ४० पदांना राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे मान्यता दिली आहे.

या आयटीआयची निर्मिती आणि त्याकरिता लागणाऱ्या एकूण ४० शिक्षक व शिक्षकेतर पदांना तसेच यंत्रसामग्री, हत्यारे याकरिता २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५५५.६३ लाख रुपये आणि ४० शिक्षक व शिक्षकेतर पदांचे वेतन आणि इतर आनुषंगिक खर्चासाठी प्रतिवर्षी २२५.६३ लाख रुपये इतक्या खर्चास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने मान्यता दिली आहे.

ITI
Rare Plants Found : पुरंदरमध्ये आढळल्या ४४ अतिदुर्मीळ वनस्पती

प्रस्तावित अभ्यासक्रमांचा तपशील

व्यवसाय : तुकड्यांची संख्या : प्रवेश क्षमता

कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट : ०२ : ४८

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : ०२ : ४८

टूल ॲण्ड डायमेकर : ०२ : ४०

मेकॅनिक मोटार व्हेईकल : ०२ : ४०

मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर : ०२ : ४०

मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटिंग : ०२ : ४०

फिटर : ०२ : ४०

इलेक्ट्रीशियन : ०२ : ४०

वेल्डर : ०२ : ४०

एकूण : १८ : ३७६

येरवड्यात नव्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) उभारण्यात येणार आहे. या आयटीआयसाठी तुकड्या आणि पदांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याशिवाय आयटीआयची निर्मिती, यंत्रसामग्री आणि त्या अनुषंगाने खर्चास मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे या आयटीआयच्या उभारणीला गती मिळू शकणार आहे.

- यतीन पारगावकर, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण, पुणे प्रादेशिक कार्यालय

येरवडा येथे आयटीआय संस्था स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला. या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन चाकण, रांजणगाव परिसरात रोजगाराच्या संधी निश्चितपणे उपलब्ध होतील, असा विश्वास आहे.

- सुनील टिंगरे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.