देशात ७० लाख मधमाशांच्या वसाहती गरजेच्या तज्ज्ञांचे मत; भविष्यातील हरित क्रांतीसाठी ठरणार महत्त्वाचे पाऊल जागतिक मधमाशी दिन - लोगो
पुणे, ता. १९ : मधमाशी हा किटक केवळ गोड मधाचीच पूर्तता करतो असे नव्हे, तर वनस्पतींच्या परागीभवनाच्या प्रक्रियेसाठी त्यांची निसर्गात महत्त्वाची भूमिका असते. त्यात देशातील सुमारे १२ प्रमुख पिकांसाठी ७० लाख मधमाशांच्या वसाहतीची गरज आहे. तर राज्याची गरज सुमारे दोन लाख मधमाशांच्या वसाहतीची आहे. मात्र प्रत्यक्षात मधमाशांच्या वसाहतींची संख्या तुलनेने कमी आहे. परंतु भविष्यातील हरीत क्रांतीसाठी तसेच मधमाशांच्या वसाहतींत वाढ करणे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
जगात आज सुमारे ५ कोटी मधमाशांच्या वसाहती पाळल्या जात आहेत. यामध्ये चीन अव्वल स्थानावर असून तेथे १ कोटी वसाहती पाळल्या जात आहे. राष्ट्रीय कृषी आयोगाच्या अहवालानुसार, भारताची कमीतकमी एक कोटी वसाहती पाळण्याची क्षमता आहे. पर्यावरण संतुलनासाठी मधमाशीपालन हा उपयुक्त पर्याय ठरतो. मात्र सध्या मधमाशीपालनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वनीकरण, सामाजिक वनीकरण या कार्यक्रमांतर्गत मधमाशांना उपयुक्त अशा वृक्षांची निवड करणे, उपयुक्त पीकपद्धती ठरविणे, किटकनाशकांची फवारणी न करणे या स्वरूपाच्या व्यवस्थापनातून मधमाशापालन व्यवसायावरील सर्व अडचणींवर मात करून व्यवसाय वाढवता येईल, असे अभ्यासक सांगतात.
मधमाशीपालनामुळे वनवासी, आदिवासी, अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतमजूर यांना एक अल्पभांडवली स्वयंरोजगार उपलब्ध होईल, त्याच बरोबर फुलातून सुकून जाणारा मकरंद मधमाशांच्या माध्यमातून गोळा करून लाखो किलो मध आणि मेणाचे उत्पादन मिळेल. मधमाशांपासून मिळणारा मध, मेण, पराग आदी मौल्यवान पदार्थांचे संकलन, प्रकिया, विक्री या माध्यमातून ग्रामीण सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पिकांच्या हेक्टरी उत्पादनात आणि पौष्टिकतेत वाढ होईल. परिणामी, मधमाशा हा घटक अन्न सुरक्षा अभियान यशस्वी करण्यात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो, असे केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे सहायक संचालक सुनील पोकरे यांनी सांगितले.
वाढती लोकसंख्या, प्रदूषण, हवामानबदल यामुळे कृषी उत्पादनावरही परिणाम होत आहे. अशा परिस्थितीतदेखील शेतीतून चांगल्या दर्जाच्या उत्पादननिर्मितीसाठी मधमाशीपालन चांगला पर्याय ठरू शकतो. वनस्पतींच्या परागीभवन प्रक्रियेसाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. बहुतांश पिके ही परागीभवनासाठी संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात मधमाशा किंवा इतर उपयुक्त किटकांवर अवलंबून असतात. त्या अनुषंगाने मधमाशीपालन उपयुक्त आहे.
- सुनील पोकरे, सहायक संचालक, केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.