Pune News : कामे नियोजित वेळेत पूर्ण करा - चंद्रकांत पाटील
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. ११) समान पाणी पुरवठा, जायका, पीएमपी बस डिझेलमुक्त करणे, वाघोली येथील बाह्यवळण मार्ग यावर बैठक घेऊन चर्चा केली. ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करा, असा आदेश अधिकाऱ्यांना दिला. तसेच कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी एकत्रित उपाययोजना कराव्यात, असेही पाटील यांनी सांगितले.
पुणे महापालिकेतील झालेल्या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) राहुल मेहवाल, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, ‘पीएमपी’चे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक सचींद्र प्रताप सिंह, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर आदी यावेळी उपस्थित होते.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, ‘पीएमआरडीए’ यांनी ‘पीएमपी’ला देय असलेली रक्कम द्यावी असे पाटील यांनी सांगतानाच सातवा वेतन आयोग, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी याचाही आढावा घेतला. ‘पीएमपी’च्या अद्याप १२३ बस डिझेलवर धावत आहेत. त्या येत्या दोन महिन्यांत ‘सीएनजी’वर रुपांतरीत कराव्यात, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.
वाघोली येथे सुमारे साडेचार किलोमीटरचा बाह्यवळण मार्ग आखला आहे. हा मार्ग पूर्वी ‘पीएमआरडीए’मार्फत केला जाणार होता. पण आता वाघोली महापालिकेत आल्याने ‘पीएमआरडीए’च्या मदतीने हा मार्ग पुणे महापालिका करणार आहे. यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही निधीची तरतूद महापालिकेने करावी, असा आदेश पाटील यांनी दिला. नगर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बससाठी जागा निश्चित करावी, वाघोली येथे नवीन वीज उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करावी, अशा सूचनाही पाटील यांनी केल्या.
पाण्याचा अहवाल तयार करा
समान पाणी पुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करा, असे सांगतानाच पाटील यांनी जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची माहिती घेतली. हा प्रकल्प २०२५ अखेरीस पूर्ण होणार आहे. त्यामुळे शुद्ध केलेले पाणी बांधकाम, उद्योग, उद्याने, शेती आदींना देण्यासाठी मागणी व पुरवठ्याचा अहवाल तयार करा, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.