जवान चित्रपट परीक्षण
लोगो ः नवा चित्रपट
---
जवान
सोसण्यापलीकडचा सोशल डोस!
- महेश बर्दापूरकर
शाहरुख खानचा ‘जवान’ लष्करातील एका जवानाची गोष्ट सांगता सांगता रॉबिनहूडच्या दिशेनं जातो. बाप आणि मुलाची ही गोष्ट काही ठिकाणी मनोरंजक, तर अनेकदा तुफान कंटाळवाणीही झाली आहे. शेतकरी आत्महत्यांपासून उद्योगांच्या प्रदूषणापर्यंतचे प्रश्न सोडवू पाहणारा आणि तुमच्या एका मताची किंमत काय आहे, यावर सणसणीत भाषण ठोकणारा नायक वेगळा ठरत असला, तरी हा सोशल डोस पचायला जड जातो. विविध रुपांतील शाहरुख खानसह अभिनेत्यांची मोठी फौज, दमदार छायाचित्रण, गाणी, तुफान ॲक्शन या जमेच्या बाजू असूनही ढिसाळ कथा, पटकथा आणि अरुण कुमार ऊर्फ अटली यांच्या दिग्दर्शनातील त्रुटींमुळं चित्रपट अविस्मरणीय ठरत नाही.
‘जवान’ची सुरवात ईशान्येकडील राज्यातील एका गावात होते. नदीच्या पाण्यातून वाहत आलेल्या व्यक्तीला एक महिला वाचवते. मात्र, काही दिवसांतच या गावावर मोठा हल्ला होतो. ती अंगभर बॅण्डेज गुंडाळलेली व्यक्ती दुष्टांचा संहार करते व शेवटी प्रश्न विचारते ‘मै कौन हूं?’. काळ ३० वर्षं पुढं सरकतो. मुंबईत मेट्रो ट्रेन हायजॅक केली जाते व प्रवाशांना ओलिस ठेवत एक उद्योगपतीकडं ४० हजार कोटींची मागणी केली जाते. ही मागणी उद्योगपतीच्या मुलीमार्फत केली जाते. (एवढ्या मोठी व्यक्तीची मुलगी मेट्रोतून प्रवास का करते, हा प्रश्न विचारायचा नाही.) सर्व पैसा भारतातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात आणि ही व्यक्ती आपलं नाव विक्रम सिंग (शाहरुख खान) असल्याचं सांगते आणि उद्योगपती असतो शस्त्रास्त्रांचा पुरवठादार काली (विजय सेतुपती). हा आपला एथिकल टेररिस्ट आता एक हॉस्पिटल ओलिस ठेवत आणखी काही मागण्या करतो आणि ही मालिका तो पुन्हा फ्लॅश बॅकमध्ये गेल्यावर थांबते. कारण खरा विक्रम सिंग सैन्यात असतो व त्यानं कालीशी पंगा घेतल्यानं मृत घोषित झालेला असतो. आपला नायक आझाद राठोडचं (शाहरुखच) समाजकार्य संपत आल्यानं तो आपल्या या वडिलांचा, विक्रम सिंगचा बदला घेण्याचं ठरवतो व कालीच्या मागं हात धुवून लागतो. (मधल्या काळात विक्रम आणि त्याची पत्नी ऐश्वर्या (दीपिका पदुकोण) आणि आझादविरोधात लढणारी पोलिस अधिकारी (नयनतारा) यांच्या लव्ह स्टोरींचा बोनसही दिला जातो.) आझादला (तो काम (?) करीत असलेल्या) तुरुंगामधील महिलांची साथ मिळते व थोड्या रक्तरंजित आणि बहुतांश विनोदी हाणामारीनंतर हा बदला पूर्ण होतो.
चित्रपटाची कथा शाहरुख खानसाठीच लिहिलेली असल्यानं प्रत्येक गोष्ट त्याच्या पात्रापाशी येऊन थांबते. तो कधी टक्कल करून, तर कधी मास्क लावून लोकांना न्याय देत राहतो. तो कारखाने बंद पाडतो आणि इव्हीएम चोरून इलेक्शन योग्य वातावरणात घेण्याची मागणीही करतो. हे करताना तो गाड्यांपासून हेलिकॉप्टरपर्यंत अनेक गोष्टी उडवतो. त्यामुळं अनेक ठिकाणी कथेतील लॉजिक हरवतं, मात्र प्रेक्षकाला समोर घडणारं नाट्य पाहात राहावं वाटेल याची काळजी दिग्दर्शक घेतो. शेवटी सर्व गोष्टी जुळवून आणत शेवट उरकला जातो. अनेक चित्रपटांच्या कथांची ही सरमिसळ केवळ तंत्रज्ञान आणि अभिनेत्यांच्या जोरावर सुसह्य केली जाते.
अभिनयाच्या आघाडीवर अर्थातच सबकुछ शाहरुख खान आहे. तो विनोद, नृत्य, ॲक्शन, प्रेम असं सर्वकाही करतो. काही ठिकाणी त्याचं वय लपत नसलं, तरी चाहत्यांना खूष करण्यात तो कमी पडत नाही व त्याच्या करिअरचा ग्राफ आणखी वर सरकतो. विजय सेतपुती खलनायकाच्या भूमिकेत शोभून दिसतो, मात्र दुर्दैवानं त्याचा पुरेसा प्रभाव पडत नाही. नयनतारा ही तमीळ अभिनेत्री चांगला प्रभाव पाडते. दीपिका पदुकोण छोट्या भूमिकेत भाव खाऊन जाते, मात्र सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, सुनील ग्रोवर यांना पुरेशी संधी नाही.
----
छायाचित्र - ६६४८०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.