संशोधन अधिछात्रवृत्तीच्या जागा वाढणार
पुणे, ता. ११ ः राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीच्या जागांचा पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) यांच्या वतीने संशोधनाला चालना मिळावी म्हणून विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. मागील वर्षीपर्यंत चारही संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येत होती. मात्र, जून २०२३ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या चारही संस्थांच्या संशोधन शिष्यवृत्तीला मर्यादा घालून दिली आहे. पूर्वी जिथे ८०० ते १२०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जायची, तीच आकडेवारी आता ५० ते २०० विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. याबद्दल समाजातील सर्वच स्तरातून आक्रोश व्यक्त झाला. ‘सकाळ’नेही वेळोवेळी यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेरीस प्रशासकीय स्तरावर हालचाली झाल्या असून, प्रत्येक संस्थेसाठी संख्येची मर्यादा वाढवून देण्यात येणार आहे. मात्र, याचा अंतिम निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीतच होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
संस्थांनुसार जागा
संस्था ः आत्ताची मर्यादा ः पूर्वीची अंदाजे संख्या
सारथी ः ५० ः ८५१
बार्टी ः २०० ः १२००
महाज्योती ः ५० ः उपलब्ध नाही
टीआरटीआय ः १०० ः उपलब्ध नाही
मी मराठा समाजातील विद्यार्थी असून, सेट-नेट परीक्षा झाल्यानंतर पीएच.डी. करू इच्छितो. जर मला ‘नेट जेआरएफ’ मिळाली नाही, तर सारथीच्या संशोधन शिष्यवृत्तीचा मला मोठा आधार होईल. पण सरकारने अधिछात्रवृत्तीच्या संख्येला मर्यादा घातल्यामुळे माझ्यापुढील अडचणी वाढल्या असून, सरकारने या संख्येबाबत पुनर्विचार करायला हवा.
- विज्ञान शाखेतील सेट उत्तीर्ण विद्यार्थी
फोटो ः 67084
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.