Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023esakal

Ganesh Chaturthi 2023 : केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे; धनकवडीतील गणेश मंडळांकडून एकत्रित मिरवणुकीचा निर्णय

गणेशोत्सव काळात अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्याची संधी अनेक गणेश मंडळांना
Published on

पुणे : समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, ‘‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.’’ प्रयत्न करा, कार्य करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यासाठी सर्वप्रथम स्वतः पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे. गणेशोत्सव काळात अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्याची संधी अनेक गणेश मंडळांना आहे. धनकवडीतील ११ मंडळांनी यात आघाडी घेतली आहे. समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण करण्याचा कौतुकास्पद निर्णय त्यांनी घेतला आहे.

राष्ट्रीय एकतेची भावना वाढविण्यासाठी धनकवडीमधील ११ मंडळांतर्फे गणेश चतुर्थीच्या दिवशी (ता. १९) एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘स्वराज्य रथा’वर अकरा गणेश मंडळांचे गणपती विराजमान करून ही मिरवणूक काढण्यात येईल, अशी माहिती अखिल मोहननगर मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पोळ आणि विश्वस्त अनिरुद्ध येवले यांनी दिली.

गणेशोत्सवात स्वच्छता कर्मचारी आणि खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरला मोफत आरोग्य शिबिरात मधुमेह आणि किडनी तपासणी करण्यात येणार आहे, असे येवले यांनी सांगितले. पुणे शहरातील अन्य गणेश मंडळांनी एकत्रित येऊन नवा पायंडा पाडण्यासाठी ही चळवळ पुढे चालविण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. संतोष धनकवडे, उदय जगताप, आनंद शिंदे, विजय क्षीरसागर, प्रतीक कुंभार, अभिषेक तापकीर, अनिकेत झाड, अजय इंगळे, मिलिंद काळे आणि सोमनाथ शिर्के यावेळी उपस्थित होते.

ही मंडळे होणार सहभागी
धनकवडीमधील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाइव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहननगर मित्र मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

उपक्रमाबाबत...
- १९ सप्टेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच दरम्यान मिरवणूक
- दहा हजार नागरिक सहभागी होणार
- मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहननगर या मार्गाने जाणार
- ज्ञानप्रबोधिनी वाद्य आणि गोविंद बँड पथक त्यात सहभागी होणार

गणेश मंडळांना आवाहन
गीतेवर प्रवचन देताना विनोबा भावे म्हणतात, ‘‘फळाची आशा ठेवू नका असे सांगताना कर्म उत्कृष्ट झाले पाहिजे असे गीता बजावीत आहे. सकाम पुरुषाच्या कर्मापेक्षा निष्काम पुरुषाचे कर्म अधिक चांगले झाले पाहिजे, ही अपेक्षा योग्यच आहे. कारण सकाम पुरुष फलासक्त असल्यामुळे फळाविषयीच्या स्वप्नचिंतनात त्याचा थोडा-बहुत कालक्षय आणि शक्तीक्षय होणारच.

परंतु फलेच्छारहित पुरुषाचा प्रत्येक क्षण आणि सर्व शक्ती कर्मातच उपयोजिली जाणार.’’ गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गीतेतील हा संदेश लक्षात ठेवावा व धनकवडीतील ज्या ११ मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे, तसा निर्णय घेऊन स्वतःही आदर्श निर्माण करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.