दगड, धातू, फायबर व सिपोरेक्सची शिल्पे
पुण्यातील चेतन वैती हे निरनिराळ्या माध्यमांतून शिल्परचना करतात. माणसांचे पुतळे तर ते तयार करतातच, पण प्राण्यांच्या वेधक शिल्परचना करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
वैती म्हणाले, ‘‘मूळचा मुंबईचा असलो तरी वीस वर्षे पुण्यात राहून कलानिर्मिती करतो आहे. दहावीनंतर पुण्यात आलो. एका कंपनीत शिकाऊ म्हणून भरती झाली. नंतर मी तेथेच कायम झालो. कलेचा बालपणापासून असलेला ध्यास शांत बसू देईना. यासाठी मी चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. यासाठी कंपनीत रात्रपाळी करू लागलो. सकाळी तास असायचे. दुपारी थोडी विश्रांती आणि सायंकाळी सराव. या प्रकारे पाच वर्षे नोकरी व शिक्षणाचा तोल सांभाळत अथक परिश्रम केले. जी. डी. आर्ट केल्यावर नोकरी सोडून पूर्ण वेळ व्यावसायिक कलावंत म्हणून सुरुवात केली. अगोदरच्या काळात निरनिराळ्या पद्धतीची चित्रे काढायचो. अलिबागला शैक्षणिक सहली दरम्यान करमरकरांचा स्टुडिओ पाहिला. तेथील शिल्पे पाहून प्रभावित झालो. तेव्हा प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे हे काही वर्षे पुण्यात होते. त्यांच्याकडे शिकून पुढे माझ्या पद्धतीने मी ही कला आत्मसात केली.’’
वैती यांनी सांगितले की, ‘‘काळा पाषाण, संगमरवर, वालुकाश्म व ग्रॅनाइट आदींचा उपयोग करून कलाकृती घडवू लागलो. धातू, फायबर व सिपोरेक्स या माध्यमांतही काम करत गेलो. धातू व फायबरमध्ये काम करताना थोडेसे चुकले तरी दुरुस्ती करता येते. परंतु, दगडात मात्र कणभर चूकही महागात पडते. तो दगड सोडून द्यावा लागतो. केलेले काम, वेळ व श्रम वाया जातात. यासाठी अचूकता महत्त्वाची. यामुळे यात आव्हान प्रचंड असते. पण, धातू व फायबरसारखी प्रक्रिया यात करावी लागत नाही. दगडातील नैसर्गिकता मला फार आवडते. व्यक्तींचे अर्धपुतळे व पूर्णाकृती शिल्पे वास्तववादी शैलीत साकारतो. प्राणी, पक्षी व म्युरल्स करताना काही वेळा कलात्मक शैलीचा वापर करतो. मोर, हरिण, मांजर, सिंह वगैरेंची शिल्पे केली आहेत. पण, घोडा साकारणे हे खास आवडीचे. त्याचा आकार, उभे राहणे व चालण्यातील डौल, लय वगैरे मला शिल्पांमधून अभिव्यक्त करायचा सतत मोह पडतो. कलाकार व्हायची तीव्र इच्छा होती आणि ती पूर्ण झाली, याचे समाधान वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.