अरबी समुद्रातील दुसरा सर्वाधिक ‘बिपरजॉय’  

जून महिन्यातील चक्रीवादळांच्या स्थितीवरून जेटीडब्ल्यूसी संस्थेची माहिती

अरबी समुद्रातील दुसरा सर्वाधिक ‘बिपरजॉय’ जून महिन्यातील चक्रीवादळांच्या स्थितीवरून जेटीडब्ल्यूसी संस्थेची माहिती

Published on

पुणे, ता. ११ ः अरबी समुद्रात वाढत्या तापमानामुळे पूर्वमोसमी चक्रीवादळांच्या निर्मितीबरोबर त्याची तीव्रताही वाढू लागली आहे. त्याच धरतीवर जून महिन्यात अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची स्थिती पाहता यंदाचे ‘बिपरजॉय’ हे दुसरे सर्वाधिक तीव्र चक्रीवादळ ठरले आहे. हे १९८२ पासून आजवर जून महिन्यात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांपैकी एक तीव्र चक्रीवादळ आहे, असे ‘जॉइंट टायफून वॉर्निंग सेंटर’ (जेटीब्ल्यूसी) संस्थेने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

अरबी समुद्रात ६ जून रोजी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. त्या चक्रीवादळाची अतितीव्रमध्ये रूपांतरित झाले आहे. उष्णकटीबंधिय चक्रीवादळांचा अभ्यास करणाऱ्या जेजू येथील जेटीडब्ल्यूसी या संस्थेद्वारे ही माहिती दिली आहे. त्‍यानुसार जून २००७ मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या गेनू हे १९८२ पासून ते आतापर्यंतचे सर्वाधिक तीव्र असे चक्रीवादळ होते.

याबाबत उष्णकटीबंधिय हवामानशास्त्र संस्थेचे (आयआयटीएम) माजी संशोधक व ‘टायफून रिसर्च सेंटर’चे विनीत कुमार यांनी सांगितले, ‘‘सध्या निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’दरम्यान अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान (एसएसटी) हे ३१ ते ३२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तर हे सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी अधिक आहे. गेल्या चार दशकांमध्ये मॉन्सूनपूर्व काळात अरबी समुद्राच्या एसएसटीमध्ये १.२ ते १.४ अंशांनी वाढ झाली आहे. यामुळे तीव्र चक्रीवादळांच्या निर्मितीची स्थिती पाहायला मिळते. दरम्यान, या पूर्वमॉन्सून हंगामात उत्तर हिंद महासागरातील बिपरजॉयची ‘संचित चक्रीवादळ ऊर्जा’ (एसीई) २७.६ वर पोहोचली आहे. जेटीडब्ल्यूसीनुसार १९८२ पासून आतापर्यंत पूर्वमॉन्सून हंगामात उत्तर हिंद महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाची उर्जा पाहता ही दुसरे सर्वाधिक उर्जा असलेले चक्रीवादळ ठरले.’’

असे झाले नामकरण
अरबी समुद्रातील चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ हे नाव बांगलादेशने दिलेल्या नावातून दिले आहे. याचा अर्थ ‘आपत्ती’ असा होतो. दरम्यान, या प्रणालीची तीव्रता पाहता याचा थेट धोका महाराष्ट्रावर होणार नाही. या चक्रीवादळाचे नामकरण जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) जारी केलेल्या पद्धतीनुसार आहे. सातत्याने निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचा गोंधळ टाळण्यासाठी अशा चक्रीवादळांना नाव दिले जाते.

‘बिपरजॉय’ची सद्यःस्थिती
- अतितीव्र चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ रविवारपर्यंत (ता. ११) मुंबईपासून ५६० किलोमीटर पश्चिमेकडे, तर गुजरातच्या पोरबंदरपासून ४३० किलोमीटर
- द्वारकेपासून ही प्रणाली ५१० किलोमीटर नैर्ऋत्येकडे, तर पाकिस्ताच्या कराचीपासून ७७० किलोमीटर दक्षिणेकडे
- या चक्रीवादळाचा मार्ग बदलला असून गुरुवारपर्यंत (ता. १५) ताशी १२५ ते १५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील
- गुरुवारपर्यंत (ता. १५) हे वादळ गुजरात आणि पाकीस्तानच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा

जूनमधील अरबी समुद्रातील
सर्वात तीव्र चक्रीवादळे (१९८२ पासून आजवर) ः
१. गोनू चक्रीवादळ (१४५ नॉट्स)
२. १९९८ मधील आणि जून २०२३ मधील बिपरजॉय चक्रीवादळ (१०५ नॉट्स)
३. वायु चक्रीवादळ (१०० नॉट्स)

म्हणून वाढते चक्रीवादळाची तीव्रता
- जागतिक तापमान वाढीमुळे उत्तर हिंद महासागरतील जलद तापमानात वाढ
- समुद्रातून वातावरणात उष्णतेचा प्रवाह वाढवतो व चक्रीवादळांची तीव्रता वाढते

- जलद तीव्रतेचे निरीक्षण करणे आणि अंदाज करणे हे एक आव्हान

एकाच वर्षात दोन तीव्र चक्रीवादळ ः
उत्तर हिंद महासागराच्या इतिहासातील ही केवळ दुसरी वेळ आहे, की एकाच वर्षात पूर्वमॉन्सून हंगामात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ हे श्रेणी ३ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे चक्रीवादळ ठरले. या पूर्वी २०१९ मध्ये अशीच स्थिती पाहायला मिळाली होती. त्यामध्ये अरबी समुद्रातील वायू (श्रेणी ३ चे चक्रीवादल) आणि बंगालच्या उपसागरातील फॅनी (श्रेणी ५ चे चक्रीवादळ) या चक्रीवादळांची नोंद झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.